बावडा : पिठेवाडी येथील नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या तीन-चार खांबांना भगदाड पडले आहे. दगड वाहून गेल्याने कमजोर झाल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बंधारा कोरडा पडल्याने शेतातील पिके जळून गेली असून नागरिकांच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नीरा नदीवरील बंधारे वेळेवर अडविण्याचे नियोजन केले असते व भाटघरचे नीरा नदीत सोडलेले पाणी हे सर्व बंधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केले असते, तर आजची गंभीर परिस्थितीही शेतकऱ्यांवर आली नसती. तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली नाही तर मात्र आगामी पावसाळ्यात या बंधाऱ्याला आरपार बोगदा पडून पाणी अडणार नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रतापराव पाटील, महादेव शेंडगे, सरपंच संगीता शेंडगे, ज्ञानदेव वाघमोडे, विष्णू वाघमोडे, रामचंद्र पाटील, बापू बंडगर, वसंत शेंडगे, दशरथ कचरे, बापू चोरमले, बापू वाघमोडे, श्रीमंत वाघमोडे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून बंधाऱ्याची पाहणीदरम्यान रविवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पिठेवाडी बंधाऱ्याच्या दुरवस्थेची पाहणी केली. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने खर्चाचा प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. त्यानुसार उद्या सोमवारी जलसंपदाचे अधिकारी जगदाळे अधिकाऱ्यांसह तातडीने बंधाऱ्यास भेट देतील, असे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलताना सांगितले.
पिठेवाडी बंधाऱ्याच्या खांबांना भगदाडे
By admin | Published: May 01, 2017 2:20 AM