पुणे : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात खोदून ठेवलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी ३० मेपर्यंतची दिलेली मुदत उलटून गेल्यानंतर, पुन्हा १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, ही मुदत वाढवून देऊनही अद्याप सर्व रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. मध्यवस्तीसह उपनगरांतील रस्ते अर्धवट करण्यात आले आहेत. तर, बऱ्याच ठिकाणी खोदाई सुरू आहे. विशेष म्हणजे, सिमेंटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत.
शहरातील महत्त्वाचा असलेला बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खोदाई करून ठेवण्यात आलेली आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या खोदाईचे काम काही रस्त्यांवर सुरू आहे. तर, महावितरण, रिलायन्स आदी कंपन्यांचे कामही करण्यात आलेले आहे. मध्यवस्तीतील मलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे.
या उकरत्ल्या रस्त्यांवरील खोदाईची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले होते. परंतु, ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. लॉकडाऊनच्या कालावधीत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन ढेपाळले आहे.
---
१. नारायण पेठेकडून टिळक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. पथ विभागाकडून हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सिमेंटच्या रस्त्यावरील खड्डे डांबर आणि खडीच्या मिश्रणाने भरले जात आहेत.
२. टिळक रस्त्यावर पावसाळापूर्व तसेच जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या रस्त्यावर अर्धवट दुरुस्ती करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी खोदाईच्या जागी केलेला सिमेंटचा रस्ता खचला आहे.
३. लक्ष्मी रस्ता आणि परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची टीका होऊ लागली आहे.
-----
रस्तेखोदाई आणि रस्त्यांची डागडुजी याबाबत पालिका प्रशासन आणि बडे अधिकारी ठेकेदारांसमोर हतबल असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत नाही. राजकीय दबावापोटी या ठेकेदारांवर कारवाई केली जात नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.