इंदापूर : शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर पावसाळ्यामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर, इंदापूर महाविद्यालयासमोर व शासकीय विश्रामगृहाजवळ रस्त्याच्या मधोमध खड्डे पडून, त्यामध्ये पावसाचे पाणी साठत असल्याने वाहन चालवताना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यात पाणी साठल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने जोराने वाहने आदळतात आणि अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा जुना पुणे-सोलापूर महामार्ग असून, त्यांनी तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
इंदापूर शहरात अनेक डांबरी रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहेत, त्यामुळे एकदा पाऊस पडला तरी रस्ते उखडताना दिसून येत आहेत. एकूण निधी तर वाया जातच आहे, पण अपघातही होण्याची जास्त शक्यता आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर जर खड्डे पडले असतील तर ते तत्काळ दुरुस्त करण्यात येतील.
११ इंदारपूर
११ इंदापूर १
११ इंदापूर २
इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर महामार्गावरील, सार्वजनिक बांधकाम विभागासमोर, शासकीय विश्रामगृहासमोर व इंदापूर महाविद्यालयासमोर उघडलेला डांबरी रस्ता.