घोडेगाव : पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यात अतिशय अवघड ठिकाणी वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागा निश्चित झाली आहे. येथील ग्रामस्थांनी अभयारण्य क्षेत्रातील आपली जागा सोडून देण्याचे लेखी पत्रही वनविभागाला दिले आहे. माळीण दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवसांत दि. १ आॅगस्ट रोजी साखरमाची येथे दरड पडली. दरड पडल्यामुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, या लोकांचा रस्ता बंद झाला, शेतांमध्ये माती साचली. येथील १३ कुटुंबांपैकी ४ कुटुंंबांची घरेही यामध्ये पडली. त्यामुळे हे ग्रामस्थ मुरबाड तालुक्यातील उचल या गावात स्थलांतरित झाले. साखरमाची ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे, अशी मागणी होती. वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी पुणे व ठाणे जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागाही निश्चित झाली आहे. तसेच, ग्रामस्थांनी अभयारण्यात असलेल्या आपल्या जागा सोडून देण्याचे लेखी पत्र तयार करून, वनविभागाला दिले आहे. पुनर्वसन होईपर्यंत दरडीत घरे पडलेल्या चार कुटुंबांसाठी तात्पुरती निवासी शेड बांधून मिळावीत, आदिवासी विकास विभागाने घरकुल योजनेतून घरे द्यावीत, ठाणे जिल्ह्यात रेशनकार्डवर धान्य मिळावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. (वार्ताहर)
साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित
By admin | Published: October 13, 2014 12:27 AM