पुणे : अलंकार पोलिस ठाणे, सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगार शुभम शिंदे याच्याविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली.
शुभम सिताराम शिंदे (२१, रा. स्फुर्ती अपार्टमेंट, सह्याद्रीनगर, धनकवडी, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवघेण्या हत्यारांसह फिरताना चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत पसरवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. शुभम शिंदे याच्या विरोधात मागील पाच वर्षात ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र मळाळे व पीसीबी गुन्हे शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी केली.