पुणे : शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या दोन महिन्यांत स्वतंत्र प्लेसमेंट सेल सुरू केला जाणार आहे. हा सेल सर्व संलग्नित महाविद्यालयांशी जोडला जाणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातून बाहेर पडताना लगेचच करिअरचे वेध लागतात. शिक्षण घेत असतानाच नोकरीसाठी त्यांची शोधाशोध सुरू होते. ही गरज ओळखून अनेक महाविद्यालयांनी स्वतंत्र प्लेसमेंट सेल सुरू केले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे. शिक्षण संपले की लगेचच नोकरी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही असा प्लेसमेंट सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना डॉ. गाडे म्हणाले, की प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत असतात.मात्र, काही विभागांत कॅम्पस मुलाखती होऊन, त्या विभागातील विद्यार्थ्यांना नोकरी लागते. ही स्थिती सर्वच विभागांत निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट सुरू करण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठ आवारात हा सेल सुरू होणार असून, तो संलग्नित महाविद्यालयाशी जोडला जाईल.सेलसाठी विद्यापीठाने अनेक कंपन्यांशी चर्चा केली असून, काही कंपनीशी करारही झाला आहे. सेलच्या माध्यमातून कंपन्या विद्यार्थ्यांशी आॅनलाइन संवाद साधू शकतात. त्यांना आॅनलाइनद्वारे संपर्क साधून, प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी कंपन्यांकडून मिळणार आहे. विद्यापीठ परिसरासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. या सेलसाठी उपकुलसचिव पदाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या विभागात १० ते २० कर्मचारी नेमले जातील. ही सर्व यंत्रणा येत्या दोन महिन्यांत विद्यापीठात अस्तित्वात येईल, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठात आता प्लेसमेंट सेल
By admin | Published: May 30, 2015 1:03 AM