पुणे : 'कोरोना विषाणूवर शास्त्रीय, वैज्ञानिक, वैद्यकीय उपाय हेच एकमेव उत्तर आहे. सुरक्षेसाठी शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असले तरी समाजावर त्याचा राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम होत आहे. सामाजिक दरी वाढत आहे. कोरोनाशी लढताना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दृष्टिकोन भिन्न-भिन्न स्वरूपाचे आहेत; तरी स्वच्छता, मास्क वापरणे, लसीकरण या प्रक्रियेला सर्वांना सामारे जावे लागणारच आहे,' असे मत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. सौम्यब्रत चौधरी यांनी व्यक्त केले. ’साहित्य, नाट्य तसेच कला आणि शिक्षण या माध्यमातून प्लेगचा दीर्घकाळ परिणाम टिकून राहिला. प्लेगप्रमाणे कोरोनाचा प्रभावही खूप वर्षे राहील असेही ते म्हणाले.
विचारवंत प्रा. राम बापट स्मृती आॅनलाइन व्याख्यानात 'प्लेगचे प्रसंग ते महामारीचे नियम : रंगभूमी आणि रोगप्रतिकारशक्ती यांच्या बखरीतील काही अंश' हा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. रंगकर्मी मकरंद साठे आणि गजानन परांजपे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्राज फाउंडेशनचे आर्थिक सहकार्य मिळाले.
कोरोना महामारीमुळे जगावर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूरगामी परिणाम झाले आहेत. प्लेग महामारीचा पगडा शंभर वर्षे समाजमनावर राहिला; तसेच कोरोनाचाही पगडा दीर्घकाळ राहील. महामारीच्या काळात मानवीय दृष्टिकोन हरवतो. सामाजिक मूल्य आणि मानवी मनाला किंमत उरत नाही; समाजाकडे केवळ तांत्रिकपणे पाहिले जाते. हा अनुभव जगाला आला असल्याकडे प्रा. चौधरी यांनी लक्ष वेधले.
कोरोनाला चीनमध्ये सुरुवात झाली तरी हा साथरोग पाश्चिमात्य देशांमध्ये जलद गतीने पसरला आणि त्यांना पूर्वेकडील देशांच्या तुलनेत अधिक फटका बसला. पाश्चिमात्य देशांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा खूप आग्रह असल्याने निर्बंध, मास्क, लस याबाबतीत पूर्वेकडील देशांचा आदर्श ठेवला पाहिजे, असा सूर तिकडे उमटत आहे. साहित्य, नाट्य तसेच कला आणि शिक्षण या माध्यमातून प्लेगचा दीर्घकाळ परिणाम टिकून राहिला, असे सांगून कोरोनामुळे यापुढची महामारी कोणती आणि मानवजातीवरील अविचल निष्ठेसाठी तिला कसे थोपवायचे या दृष्टीने विचार सुरू झाला असून, या संशोधनाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. कोरोनाच्या प्रभावातून साहित्य, नाटक आणि इतर कलांमधून ताकदीने अभिव्यक्ती होऊ शकेल, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला.
--------------------------------------------------