वारजे : रात्री मद्यापींचा त्रास होतो, घराच्या पत्र्यावर दगडी पडतात याबाबत तक्रार देण्यासाठी फिर्यादी महिला गेल्या असता, त्यांची तक्रार न घेता पोलिसांच्या दंडेलशाही व शिवीगाळीला सामोरे जावे लागण्याची घटना येथील रामनगर पोलीस चौकीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर वसाहतीत राहणाºया तबस्सुम चांद शेख ऊर्फ तब्बू या गेली काही वर्षे निळे वादळ चौक येथे राहत असून मागील १५ दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या व आसपासच्या घरांवर व दारावर दगडी पडत असल्याची त्यांची तक्रार होती. याबाबत या महिला एकत्र येत त्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास उपनिरीक्षक क्षीरसागर व इतर कर्मचाºयांसोबत आपली कैफियत मांडली. याशिवाय रात्रीच्या वेळी पोलिसांनी आपल्या भागात गस्त वाढवाव्यात याची मागणी केली. परंतु, सदर कर्मचारी व अधिकाºयांकडून तक्रार दाखल न करता, त्यांना दमदाटी व शिवीगाळ करून हाकलून देण्यात आल्याची माहिती येथील तबस्सुम शेख व आशा जाधव यांनी दिली.यानंतर, या महिलांनी राष्ट्रवादी महिला आघाडी शहर अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना संपर्क करून घटनेबाबत माहिती देऊन लक्ष घालण्याची विनंती केली. रात्री चाकणकर या स्वत: यापैकी काही महिलांना घेऊन रामनगर चौकीत गेल्या. तेव्हाही पोलिसांनी अरेरावीचीच भाषा वापरली. पण, आपला राजकीय परिचय सांगितल्यावर मात्र पोलिसांनी नरमाईची भाषा वापरली व रात्री त्या भागात गस्त घालण्याची ग्वाही दिली. यावेळी संगीता हनमघर, जयश्री भूमकर व इतर महिला या उपस्थित होत्या, तर पोलिसांच्या वतीने पीएसआय निकम, क्षीरसागर, कर्मचारी खामकर व पुजारी हजर होते.
फिर्यादी महिलांना अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:06 AM