लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड-१९ आजार व लसीकरण अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून काम करावे. तसेच, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कोविड आजार व लसीकरण मोहिमेबाबत कृतिदल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, १८ ते ४४ वयोगटातील दिव्यांग नागरिकांचे लसीकरण करा. आदिवासी भागातील पेसा ग्रामपंचायतीत लसीकरण मोहीम राबवा. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुका निहाय लसीकरण सत्राचे आयोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.
-------
आदिवासी भागातील बाल आणि माता मृत्यू रोखा
आदिवासी भागातील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्याबाबत गाभा समितीची बैठकही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माता मृत्यूदर रोखण्यासाठी स्थानिक स्त्रीरोगतज्ज्ञाची मदत घ्या. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेलाच तपासणी झाली पाहिजे याबाबत नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.