लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील मुळा, मुठा, भीमा या नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी तत्काळ नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
मुळा-मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२) रोजी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार राहुल कुल, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, जिल्ह्यातील नद्यांमधील जलपर्णी काढणे आवश्यक आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा. पुणे महानगरपालिकेने पाषाण तलाव, कात्रज तलाव, जांभुळवाडी तलावातील जलपर्णी व गाळ काढून तलावाची स्वच्छता करुन घ्यावी. तसेच नद्यांच्या पात्रांमधील जलपर्णी काढण्यासाठी पुणे, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने नियोजन करावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.