रांजणगाव गणपती : कोरोनाची तिसरी लाट येईल असे गृहीत धरून प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापासूनच योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या.
पुणे येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या शिरूर तालुक्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या ३९ गावच्या कोरोना आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे आदी उपस्थित होते.
बैठकीत शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील कोरोना रुग्णसंख्येची सद्यस्थिती प्रांताधिकारी देशमुख यांनी सादर केली. आतापर्यंत ५ हजार ६४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ४ हजार ६९९ रुग्ण बरे झाले, तर १०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ८४० अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असून त्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देशमुख यांनी या वेळी दिली.
जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून पाबळ येथे सुमारे १५ कोटी रुपये खर्चाची ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभी राहिली असल्याचे सांगितले, तर ग्रामीण रुग्णालयात अनुभवी व योग्य अर्हताधारक वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ उपलब्ध झाल्याबरोबर व आवश्यक त्या साधनसामग्रीसह ऑक्सिजन बेडचे उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी या वेळी सांगितले.
मानसिंग पाचुंदकर म्हणाले, रांजणगाव एमआयडीसी व मलठण आणि पाबळ येथे कोविड सेंटर सुरु असून टाकळी हाजी येथेही लवकरच कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
१६ रांजणगाव गणपती
पुणे येथे शिरूर तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीत कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आढावा घेतला.