पुणे : एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदलाला काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. या विद्यार्थ्यांनी पुण्यात शास्त्री राेडवर अहिल्या अभ्यासिका शेजारील इंदूलाल कॉम्प्लेक्स समोर सोमवारी सकाळी १० वाजता आंदोलन करणार होते; पण तेथील पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून विद्यार्थी अभ्यासिकांमधून बाहेरच आले नाहीत. तसेच हा ‘एमपीएससी’वरील दबाव समजून कारवाई केली जाईल,असा इशारा ‘एमपीएससी’कडून दिला गेल्याने नियाेजित आंदोलन होऊ शकले नाही.
दरम्यान, विश्रामबाग पोलीस स्टेशनकडून विद्यार्थ्यांना आंदोलनापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे समजपत्र देण्यात आले होते. यापूर्वी समाज माध्यमांतून आयोगावर टीका केल्याने काही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीतील बदलानंतर शास्त्री रोडवर काही विद्यार्थी आंदोलन करणार होते, तत्पूर्वीच पोलीस प्रशासनाकडून पावले उचलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे हे आंदोलन होऊ शकले नाही.
आयोगाचे प्रसिद्धीपत्रक
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमासंदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा घटनांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल, असे आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावरून प्रसिद्ध केले आहे.
कशी आहे नवीन परीक्षा पद्धत?
नवीन परीक्षा पद्धतीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) हटविण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्व पेपर वर्णनात्मक स्वरूपात द्यावे लागणार आहेत. सन २०२३ पासून सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. याला काही विद्यार्थी संघटनांचा विरोध असून, इतके वर्षे एमसीक्यू पद्धतीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीचे आंदाेलन
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षापासून लागू करून सध्याची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच व्हावी. ह्या मागणीकरिता निदर्शने करण्यात आली. आयोग व शासनाच्या ह्या दडपशाही विरोधात लालबहादूर शास्त्री रस्ता, नवीपेठ, येथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.