आळंदी : ‘तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावरील प्रलंबित कामे लवकरात-लवकर मार्गी लावली जातील. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासन स्तरावर विशेष नियोजन करून इंद्रायणीचे पावित्र्य अबाधित ठेवू,’ असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
आळंदी नगर परिषद व अविरत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आळंदीत 'माझी वसुंधरा अभियानांतर्गत' आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, आरोग्य समिती सभापती सागर भोसले, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले, मुख्याधिकारी अंकुश जाधव, अविरत फाउंडेशनचे संस्थापक निसार सय्यद आदींसह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
दरम्यान, ‘स्वच्छता राखू, प्रदूषण टाळू आणि निसर्गसंवर्धन करण्यासाठी कृतिशील व प्रयत्नशील राहू’ अशी पर्यावरण रक्षणाची शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी नगर परिषद सतत प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.
चौकट : आळंदी शहराला बुधवारी (दि.१३) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देत विविध कामांची पाहणी करत कामांचा आढावा घेतला. विशेषतः तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित कामांची तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची व मैलशुद्धी जागेची त्यांनी पाहणी केली.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख. समवेत मान्यवर.