पुणे : राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येत्या काळात पाण्याबरोबरच चाऱ्याचाही दुष्काळ जाणवणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. जिल्ह्यातील साडेसतरा लाख जनावरांना दररोज ५ हजार ७३६ टन चारा आवश्यक आहे. त्यानुसार चाऱ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली. राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.त्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर (सासवड), वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर , शिरूर (घोडनंदी) अशा सात ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्काळ आणि टंचाई निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याचा प्राथमिक आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पाणी प्रश्नासाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी, तर चाऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. विविध ठिकणच्या मागणीनुसार तहसीलदारांच्या माध्यमातून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेने संबंधित ठिकाणी टँकर सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत २७ टँकर सुरु झाले आहेत. त्यात आंबेगाव तालुक्यात १, बारामती १०, दौंड ४, जुन्नर आणि पुरंदर प्रत्येकी २, तर शिरुरला ८ टँकर सुरु असल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले. खरीपातील उत्पादकता आणि रब्बीची लागवड लक्षात घेता आणखी दोन महिने चाऱ्याचा प्रश्न जाणवणार नाही. मात्र, त्यानंतर चाऱ्याची उपलब्धता करुन द्यावी लागेल. त्यादृष्टीने प्राथमिक आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १७ लाख ५६ हजार ६४ जनावरे आहेत. त्यात गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांचा समावेश आहे. त्यांना दररोज ५ हजार ७३६ तर महिना १ लाख ७२ हजार ८० टन चारा आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. कटारे म्हणाल्या. ---------------जनावरांची संख्या मोठी जनावरे ८,५४,७०३लहान जनावरे २,०२,७२०शेळ्या - मेंढ्या ६,९८,६३२
जिल्ह्यातील साडेसतरा लाख जनावरांच्या चाऱ्याचे करावे लागणार नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 11:56 AM
पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याचा प्राथमिक आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देतयारी दुष्काळाची : जिल्हा दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असे वर्गीकरण खरीपातील उत्पादकता आणि रब्बीची लागवड लक्षात घेता आणखी दोन महिने चाऱ्याचा प्रश्न नाहीजिल्ह्यात आत्तापर्यंत २७ टँकर सुरु