पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यावेळी पुणे शहर व उपनगरांतील भाविकांसाठी पीएमपी प्रशासनातर्फे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक ८ जूनपासून १२ जूनपर्यंत आळंदी येथे जाण्यासाठी स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी आणि चिंचवड या ठिकाणांवरून सध्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा दररोज १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. ११ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आळंदीसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय देहू येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन, मनपा आणि निगडी या ठिकाणावरून सध्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस मिळून ३० बसेस पीएमपीकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १२ बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.
१२ जून रोजी पालखी प्रस्थान आळंदी येथून होत असल्याने पहाटे अडीच वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणांवरून आळंदीला जाण्यासाठी १८ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील बसस्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३ बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल.
तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्यावेळी म्हणजेच १४ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२ ते १ या दरम्यान थांबणार असल्याने यावेळेत महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हडपसर ते सासवडदरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णत: बंद राहणार असल्याने प्रवासी व भाविकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी म्हणून या मार्गावरील बस वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून, या बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून, अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.