‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्यासाठी डावपेच: ‘माळेगाव’ बिनविरोध निवडणुकीचे बार ठरले फुसके
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 01:51 PM2020-02-07T13:51:42+5:302020-02-07T13:54:36+5:30
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर मजबूत पकड ठेवण्यासाठी अजित पवार यांचा नेहमीच मजबूत प्रयत्न असतो.
प्रशांत ननवरे -
बारामती : तालुक्यातील माळेगाव कारखाना आणि माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादीचा झेंडा खाली उतरविण्यात राष्ट्रवादीविरोधी गटाला मागील २०१५ च्या पंचवार्षिक निवडणुकीत यश आले होते. त्यामुळे नेत्यांचे नाक समजला जाणारा कारखाना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गमावला होता. ते नाक यंदा शाबूत ठेवून ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘माळेगाव’वर झेंडा फडकविण्याचे मनसुबे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखले आहेत; मात्र राज्यात सहकारी साखर कारखानदारीमध्ये सर्वाधिक भाव दिल्याचा दावा करीत सत्ताधारी गुुरू-शिष्याच्या जोडीने आव्हान निर्माण केले आहे. सत्ताधारी गटाने निवडणूक होणारच असल्याचे सांगितल्याने बिनविरोध निवडणुकीचे बार फुसके ठरले आहेत. बिनविरोध निवडणूक ही केवळ अफवा आहे. या अफवेमागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप माळेगावच्या सत्ताधारी गटाने केला आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना धोबीपछाड देऊन माळेगाव कारखाना ताब्यात घेण्यात गुरू-शिष्याच्या जोडीने यश मिळविले होते. यंदा राज्यात अनपेक्षित सत्ता मिळाल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक बालेकिल्ला निसटणार नाही. यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा प्रयत्न आहे. पवार यांनी गुरू-शिष्याच्या जोडीला टक्कर देण्यासाठी राजकीय ‘फिल्डिंग’ लावली आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर मजबूत पकड ठेवण्यासाठी अजित पवार यांचा नेहमीच मजबूत प्रयत्न असतो. माळेगाव कारखाना वगळता तालुक्यावर पकड ठेवण्यात ते यशस्वीदेखील ठरले. बारामती तालुक्यात विधानसभा, साखर कारखाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, दूध संघ आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजवर अजित पवार यांचेच वर्चस्व असते; परंतु माळेगाव कारखाना,माळेगाव ग्रामपंचायत त्यास अपवाद ठरला.
शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा कारखाना म्हणून राज्यात या कारखान्याची ओळख आहे. या माळेगाव कारखान्याच्या राजकारणात चंद्रराव तावरे मागील ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या सत्तासंघर्षात त्यांनी पवारांविरुद्ध बंड केले होते; तसेच १९९७ मध्ये अजित पवार यांच्या पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढविली. मोठ्या मतांच्या फरकाने त्यांचे पॅनल निवडून आले. त्याची चर्चा राज्यभर झाली. त्यानंतरच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चंद्रराव तावरे व अजित पवार यांच्यात दिलजमाई केली. पुढची निवडणूक बिनविरोध झाली.
मात्र, राजकीय मतभेद तावरे-पवार यांचे कायम राहिले. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब गावडे यांचे प्रचारप्रमुख म्हणून तावरे पुढे आले. मात्र, २०१५च्या माळेगाव कारखाना निवडणुकीत चंद्रराव तावरे, रंजन तावरे, हे जुने गुरू-शिष्य पुन्हा एकत्र आले. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकूण एकवीस जागांपैकी पंधरा जागा जिंकून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली. अजित पवार यांच्या पॅनलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले होते.
त्यामुळे कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी गुरू-शिष्याची जोडी निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरली आहे. पाच वर्षे राज्यात सर्वाधिक भाव दिला,माळेगावच्या शेतकºयांना घामाचा दाम दिला. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खासगी कारखानदारीला जगविण्यासाठी सहकारी कारखानदारी धुळीला मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या अफवा राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी पसरविल्या आहेत, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी स्पष्ट केले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेदेखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
.........
गुरू- शिष्यांच्या जोडीने नुकसान केल्याचा आरोप
सत्ताधाºयांनी कारण नसताना माळेगाव कारखान्याचा घास मोठा करून गुरू-शिष्यांच्या जोडीने सभासदांचे नुकसान केले. कारखान्यावर कोट्यवधीचे कर्ज लादल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. साखरविक्रीच्या चुकीच्या नियोजनामुळे कारखान्याचे, सभासदांचे या जोडीने नुकसान केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. सत्ताधारी गटाच्या वतीने सहकार बचाव पॅनलची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्री निळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
४१० फेब्रुवारीलाच दोन्ही पॅनलची अंतिम यादी प्रसिद्ध होण्याचे संकेत आहे. दोन्ही गटाला उमेदवारी देताना नाराजाना सावरावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारखाना निवडणुकीत उमेदवारी देताना महाविकास आघाडी पॅटर्न राबविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उमेदवारीचा ‘बॅलन्स’ करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होण्याचे संकेत आहेत.