लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वन लेस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात वृक्षारोपण करण्यात आले. पुढील ३ वर्षांत या गावात ५० हजार फळझाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षारोपण अभियानाच्या प्रारंभी आंबा, फणस, सीताफळ, आवळा, पेरू आदी ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या मनुष्यबळ विभागाचे अध्यक्ष राज लुईस, डॉ. प्रशांत वार्के, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, टेक्नॉलॉजी पार्कमधील पूजा कंवर, आरती सूद, वैभव निमगिरे, सन्मती शेडगार, सरपंच आबासाहेब लोळे, उपसरपंच माउली भिसे, माजी सरपंच सुषमा भिसे, ग्रामसेवक सुनीता सपकाळ आदी उपस्थित होते.
"गेल्या दोन वर्षांपासून फिनोलेक्सने येथे २४०० वृक्ष लावले आहेत. तसेच २५ एचपी सोलर पंपही बसविण्यात आला आहे. यामुळे येथील ६७० कुटुंबांना शेती व दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध झाले आहे." असे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.
......
"मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि वाढते शहरीकरण यामुळे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. याचा सामना करण्यासाठी वन लेस वृक्षारोपण व अन्य पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी, तसेच वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे."
- हंसिका छाब्रिया, संस्थापक, वन लेस