लोकमत न्यूज नेटवर्कमहाळुंगे : जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून महाळुंगे व परिसरात संततधार पाऊस कोसळत असल्याने चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील चाकणपासून पुढे खराबवाडी ते महाळुंगे गावापर्यंतच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भर पावसात सत्ताधाऱ्यांच्या बरोबरच रस्ते कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा महामार्गावरील रस्त्यातील खड्ड्यातच झाडे लावण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी यांनी दिला. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या महाळुंगेसह या परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, खालुंब्रे परिसरात छोट्यामोठ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या रस्त्यावर जड वाहनांसह कंटेनरची ये-जा सुरु असते. कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगारांसह शाळकरी, विद्यार्थी, युवक-युवतींचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरु असते. गेल्या ८ दिवसांपासून सुरू असल्याने पावसामुळे दुरुवस्थेत भर पडली आहे.महामार्गावरील महाळुंगे हद्दीतील कला जनसेट व लोरियल कंपनीसमोर रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनचालकांना मोठी सर्कस करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने अनेकदा याठिकाणी महाविद्यालयीन युवती, प्रवाशी आपल्या दुचाकी गाडीवरून चिखलात पडून गंभीर जखमी झाले आहेत.
..तर खड्ड्यात वृक्षारोपण
By admin | Published: July 05, 2017 2:42 AM