पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने सिंहगड आणि परिसराचा विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, या अंतर्गतच सिंहगडावर शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी घालण्याचा विचार सुरु असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. तसेच गडावर होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी गडाच्या खालीच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देऊन गडावर जाण्यासाठी शटल बस सेवा सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.याबाबत राव यांनी सांगितले, की, सिंहगडाचा विकास आराखडा तयार करताना वाहतूककोंडी आणि गडावरील अस्वच्छता या दोन्ही गोष्टींना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी शिवनेरीच्या धर्तीवर या गडावरही शंभर टक्के ‘प्लॅस्टिक बंदी’ करण्याचा विचार आहे. त्यासाठी गडावर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतरही गडावर जाताना पाण्याची बाटली घेऊन जायची असेल, तर त्यासाठी उपद्रव्य शुल्क आकारून परवानगी देणे, गडावरून खाली येताना ती बाटली जमा करून ते शुल्क परत घेणे अशा प्रकारे काही उपयोजना करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच गडाच्या पायथ्याशी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देऊन सवलतीच्या दरात गडावर जाण्यासाठी शटल बस सुरू करणे, गडावरील हॉटेलचे एकाच ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करणे, धायरीपासून गडापर्यंत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होणाऱ्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी रुंदीकरण करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करणे आदी उपयोजना करण्यात येणार आहे. विकास आराखड्यात या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येणार असून अधिवेशन संपल्यानंतर लवकरच त्या संदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येणार आहे. पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणीजिल्हा प्रशासनाने पर्यटन विकास अंतर्गत सिंहगडाचा शिवनेरी किल्ल्या प्रमाणे सुनियोजित विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची राव यांनी बैठक घेतली असून, या बैठकीत गड व परिसराचा विकास, धायरीपासून सिंहगडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण, गडावरील अधिक्रमण हटवणे, येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आरो प्लॅन्ट बसविणे, आदी विविध कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंहगडावर प्लॅस्टिकबंदी करणार
By admin | Published: December 16, 2015 3:22 AM