पुणे : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभाग आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) यांच्यातर्फे रविवारी जागतिक फळबिया लागवड दिवस (१५ जुलै) साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत ऍटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) आणि भांबुर्डा वन परिसरातील वेताळ टेकडीवर फळबियांची लागवड करण्यात आली.
चिंच, पेरु, चिकू, आंबा, सीताफळ, बिबवा, बेहडा, फणस, जांभूळ, पिवळा केशिया, खजूर, आवळा, बदाम आदी ३० प्रकारच्या फळझाडांच्या बिया लावण्यात आल्या. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या बिया लागवड उपक्रमात २०० पेक्षा अधिक तरुणांनी भाग घेतला. याप्रसंगी 'आयसीएआय'चे चेअरमन सीए आनंद जाखोटिया, 'आयसीएआय'चे सचिव आणि 'विकासा'चे अध्यक्ष सीए राजेश अगरवाल, उपाध्यक्षा अंजोर खोपडे, सचिव हेमांगी कोठारी, खजिनदार साईराज कासट, सहसचिव धनंजय बजाज, वन परिमंडळ अधिकारी गणेश सरोदे, वन कर्मचारी शंकर तुपे यांच्यासह इतर सभासद आणि सीएचे विद्यार्थी उपस्थित होते.
राजेश अगरवाल म्हणाले, "आपल्याकडे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येतो. जुलै मध्यापर्यंत पाणी जमिनीत चांगले मुरते. त्यामुळे बियांच्या वाढीसाठी योग्य काळ असतो. या टेकडीवर झाडे लावली, तर पावसाच्या पाण्यात माती वाहून जाणार नाही. शिवाय फळझाडांचे इतर अनेक फायदे आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपासून १५ जुलैला आम्ही फळबिया लागवड दिवस साजरा करतो. लावलेल्या बियांची देखभाल काही स्वयंसेवक रविवारी येऊन वेळ देतात."