लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे डब्यांत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने चार पोस्ट कोविड डबे तयार केले. वातानुकूलित डब्यांत एसी डक्ट्जवळ ‘प्लाझ्मा एअर’ मशीन बसविण्यात आली. त्यामुळे बाहेर पडणारे सॅनिटायझ होतील. तसेच सामान्य डब्यांत ‘अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझर मशीन’ बसविण्यात आली. त्यामुळे कोरोना प्रसाराला आळा बसेल. सध्या हे चार डबे वेगवेगळ्या रेल्वेला जोडण्यात आले असून हा प्रयोग प्रभावी ठरल्यास अशा प्रकारचे आणखी डबे तयार केले जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने मागच्या वर्षी चार ‘पोस्ट कोविड’ प्रकारचे विशेष डबे तयार केले. मात्र, त्याची चाचणी आता केली जात आहे. हे चार डबे जयपूर-म्हैसूर, जयपूर-सिकंदराबाद, जयपूर-चेन्नई, जयपूर - कोईम्बतूर या गाड्यांना लावण्यात आले आहेत. पुढचे काही दिवस याचे परीक्षण चालेल.
कपूरथळा येथे असलेल्या रेल्वे डबा कारखान्यात पोस्ट कोविडचे डबे तयार केले गेले. यासाठी मूळ डब्यात आवश्यक तो बदल केला. डब्यात प्रवेश करताना प्रवासी हँडल धरून प्रवेश करतात. कोरोनाचे विषाणू यावरदेखील काही काळ राहतात. त्यामुळे कारखान्यात अशा हँडलवर तांब्याचे कोटिंग केले जात आहे. तसेच शौचालयामध्ये पाण्याच्या टॅबला हाताचा संपर्क येऊ नये म्हणून बदल केला गेला आहे.
बॉक्स १
सीटवरदेखील कोटिंग :
प्रवासी प्रवासादरम्यान बऱ्याच वेळ सीटवर बसून असतात. प्रवासादरम्यान अनेक डब्यांत चढतात व उतरतात त्यामुळे सीटवर कोरोनाचे विषाणू राहण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने टायटॅनियम डाय ऑक्साइडचे सीटवर कोटिंग केले आहे. त्यामुळे संसर्गापासून बचाव होऊ शकतो असा दावा रेल्वेने केला आहे.
कोट :
रेल्वे डब्यांत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आम्ही पोस्ट कोविड प्रकारचे चार डबे तयार केले. आता त्याचे परीक्षण केले जात आहे. त्यावर प्रवाशाच्या अथवा प्रशासनाच्या काही सूचना आल्या तर आवश्यक तो बदल केला जाईल. रेल्वे बोर्डाने आदेश दिल्यावर अशा प्रकारचे आणखी डबे तयार केले जाणार आहेत.
- जितेश कुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल कोच फॅक्टरी, कपूरथला ,पंजाब.