पुणे : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच प्लाझ्माची गरज भासणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण मोठे आहे. दुर्देवाने प्लाझ्मा दान करण्याबाबत उदासीनता आहे. महापालिकेने पुढाकार घेऊन प्लाझ्मा सेल सुरू करावे आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्याची गरज आहे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना गुरुवारी दिले.
महापालिकेकडे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची मोबाईल क्रमांकांसह माहिती असते. त्यामुळे या सेलमधून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना योग्य माहिती देऊन प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करता येऊ शकते. या सहजपणे करता येणाऱ्या गोष्टींची महापालिकेने तत्काळ अंमलबजावणी केली तर शहरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले. या वेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक भय्यासाहेब जाधव, स्नेहल शिनगारे, गीतांजली सारगे, सोनाली गाडे, शिवानी माळवदकर, वीणा कात्रे, ऋतुजा शिर्के आदी उपस्थित होते.
आयुक्त विक्रम कुमार यांनी ही संकल्पना प्रभावी असल्याचे मत व्यक्त करत सकारात्मकता दाखवत त्वरित अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केले जाईल, असे आश्वासन दिले.
कमी मनुष्यबळात प्रभावी उपक्रम
प्लाझ्मा सेलमुळे महापालिकेला फारसा खर्च येणार नाही आणि त्यासाठी जास्ता मनु्ष्यबळही लागणार नाही. काही स्वयंसेवी संस्थाही महापालिकेला त्यासाठी मदत करू शकतील. ही संकल्पना राबवल्यास बरे झालेल्या रुग्णांमुळे इतरांचे जीव वाचवले जाऊ शकतील, असे भिलारे म्हणाल्या.
फोटो - एनसीपी यूथ