पुणे: पुण्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर रुग्णांना प्लाझ्मा आणि रेमडीसीवरची गरज भासू लागली आहे. पण अशा परिस्थितीत प्लाझ्मादाते स्वतःहून पुढे येण्यासाठी पुण्यात प्लाझ्मा स्ट्राईकची सुरुवात झाली होणार आहे. वंदे मातरम संघटना आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
सद्यस्थितीत पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात ऑक्सिजन बेड बरोबरच रेमडीसीवरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामळे गंभीर रुग्णही वाढू लागले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यवस्थ रुग्णांसाठी प्लाझ्मा हे वरदान ठरू शकते. त्या अनुषंगाने प्लाझा स्ट्राईकला सुरुवात होणार आहे.
वैभव वाघ म्हणाले, पुण्यात इंजेक्शन मिळत नाहीये. पण प्लाझ्मादाते मिळू शकतात. अनेक रुग्णालयातून रक्तगटानुसार प्लाझ्माची मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही हा उपक्रम चालू करतोय. पुणे महानगरपालिका आणि खासगी संस्थांच्या मदतीने आम्ही कोरोनामुक्त २० हजार रुग्णांचा डाटा मिळवला आहे. त्या रुग्णांशी आम्ही संपर्क साधणार आहोत. त्यासाठी २०० लोकांची टीम कार्यरत असणार आहे. टीममधला प्रत्येक व्यक्ती एका दिवसात २५ कॉल करू शकेल. याप्रमाणे चार दिवसात त्याचे १०० कॉल पूर्ण होतील. एका आठवडयात आम्ही २० हजार लोकांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संपर्क साधून झाल्यावर होणार पुढची प्रक्रिया
कोरोनामुक्त व्यक्तींशी संपर्क साधल्यावर त्यांना प्लाझ्माची माहिती दिली जाईल. ते इच्छुक असल्यास त्या व्यक्तीकडून ब्लड सॅम्पल घेऊन रक्तपेढीत दिले जाणार आहे. जर त्या कोरोनामुक्त व्यक्तीचे प्लाझा घेण्यायोग्य असेल. तरच त्या व्यक्तीकडून प्लाझा घेतला जाईल.
परिवर्तन संस्थेनेही घेतला पुढाकार
प्लाझा द्या जीव वाचवा या मोहिमेअंतर्गत परिवर्तन संस्थेनेही प्लाझ्मा गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाशी झगडत असलेल्या रुग्णांना आपल्या प्रतिकारशक्तीची मदत करण्यासाठी संस्थेच्या इंद्रनील सदलगे यांनी आवाहन केले आहे. काही शंका असल्यास 9112131865 या नंबरवर संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले आहे.