लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. त्याच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रूग्णाला उपयोगी पडतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. काय? आहे ही प्लाझ्मा थेरपी? प्लाझ्मा म्हणजे काय? त्याचा कसा उपयोग होतो. त्याचे प्रमाण किती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहेत.
* कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेवल त्याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर रेमडेसिविर देऊनही नीट होत नाही. अशा स्थितीत ऑक्सिजन अधिक प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होतो.
* साधारणपणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी प्लाझ्माचा वापर करता येतो. एकदा २०० एम एलचा व त्यानंतर एक दिवस सोडून पुन्हा तेवढाच प्लाझ्मा दिला तर रूग्णाला आराम मिळतो.
* कोरोना रूग्ण बरा झाल्यावर १५ दिवसांनी अँटिबॉडीज विकसित होतात व तीन महिने रुग्णाच्या शरीरात असतात. या अडीच महिन्यांच्या काळातील त्या रूग्णांचा प्लाझ्मा उपयोगी असतो.
* बऱ्या झालेल्या कोरोना रूग्णाने या कालावधीत निश्चितपणे रक्तदान करावे. त्याचा दुसऱ्या रुग्णाला नक्कीच उपयोग होतो.
* आम्ही आमच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी वापरतो व त्याचा चांगला परिणाम दिसतो आहे. त्यामुळे नुकसान तरी नक्कीच होत नाही.
डॉ. सुहास कलशेट्टी, क्रिटिकल केअर एक्सपर्ट
-----//
* प्लाझ्मा म्हणजे रक्तातील पांढऱ्या पेशी. रक्तदान झाल्यावर त्या लाल पेशींपासून विलग करता येतात. त्या फायटर म्हणजे विषाणूंबरोबर लढणाऱ्या असतात.
* कोरोनातून बरे झालेल्या रूग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज विकसित झालेल्या असतात. प्लाझ्मामध्ये त्या सापडतात.
* त्यामुळे या रूग्णाचे रक्त घेऊन त्यातील पांढऱ्या पेशी कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडण्यात येतात.
* त्यामुळे त्याच्या शरीरातील कोरोना विषाणूबरोबर या पेशी लढा देतात व त्या निष्प्रभ करतात.
* आतापर्यंत याविषयी जे प्रयोग झाले त्यात अँटिबॉडीज विकसित झालेल्या नसताना किंवा कोरोना रूग्णाची स्थिती फारच खालावली असताना प्लाझ्मा देण्यात आला.
* त्यामुळे या प्रयोगाच्या यशस्वितेचे प्रमाण फार वाइटही नाही व फार चांगले आहे असेही नाही.
* विशिष्ट वेळी चांगला प्लाझ्मा उपलब्ध झाला तर निश्चितपणे त्याचा परिणाम होऊ शकतो.
डॉ. प्रदीप डिकोस्टा
आयसीयू स्पेशालिस्ट, सह्याद्री व केईएम हॉस्पिटल
---///
* रक्तदान करताना जसे रक्तगट व अन्य काही गोष्टी जुळणे आवश्यक असते, तसेच प्लाझ्माच्या बाबतीतही आहे. रक्तपेढीत त्याच्या शास्त्रीय नोंदी ठेवल्या जातात.
* रक्तपेढीत रक्त गोठवून ठेवता येते. आवश्यकता असेल त्या वेळी त्यातील प्लाझ्मा काढून घेता येतो. रक्तगट जुळेल त्यातला प्लाझ्मा काढून तो दिला जातो.
* कोरोनामुक्त रुग्णांची व रूग्ण असलेल्यांचीही संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळेच कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी रक्तदान करायला हवे, त्याचा उपयोग कोरोना रूग्णांना होईल.
* कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णामध्ये सर्वसाधारणपणे अँटिबॉडिज असतातच, पण त्या पुर्ण विकसीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा रूग्णाने २८ दिवसांनंतर रक्तदान करावे.
* प्लाझ्मा मध्ये अँटिबॉडीज किती प्रमाणात आहेत यावर त्याचा परिणाम होईल की नाही किंवा किती होईल ते अवलंबून आहे. प्लाझ्मा वेगळा करताना त्यातील अँटिबॉडीजचे प्रमाण मोजता येते.
* प्लाझ्मा थेरपीवर अजून अभ्यास सुरूच आहे. आतापर्यंत झालेल्या संशोधनात त्यात अयोग्य किंवा धोकादायक असे काही आढळलेले नाही व रूग्णाला त्याचा आजारमुक्त होण्यास ऊपयोग होतो हे सिद्ध झालेले आहे.
* कोरोनावर तसेही आत्ता रामबाण औषध नाही. रेमडेसिविर, ऑक्सिजन तसेच अन्य काही गोळ्या असे ऊपचार केले जातात. तसेच प्लाझ्मा थेरपी हाही ऊपचार आहे.
डॉ. पराग खटावकर, चेस्ट डिसीज स्पेशालिस्ट, केईएम हॉस्पिटल