राजगुरुनगर: खेड तालुक्यातील तरुणांनी प्लाझ्मादान चळवळ सुरू केली असून, आतपर्यंत २०० रुग्णांना जीवदान मिळाले आहे. केवळ एवढेच नाही तर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड त्याचशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी करावयाची पद्धत याविषयी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. या कामामुळे तरुणांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
प्लाझ्मा, रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती डोळ्यांसमोर असताना खेड तालुक्यातील सामाजिक काम करणारे एका विचाराने तरुण एकत्र आले आणि त्यांनी प्लाझ्मादानाची चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला. १७ एप्रिल रोजी ॲड. नीलेश आंधळे, सदाशिव आमराळे, अमर टाटीया, कैलास दुधाळे, बाबासाहेब दिघे व महेंद्र शिंदे यांनी एकत्र येत व्हॉट्सॲप् ग्रुप सुरू केला. या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना प्लाझ्मा दानाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच कोरोनामुक्त झालेल्या लोकांना प्लाझ्मादानसाठी प्रोत्साहित केले. कैलास दुधाळे यांनी राजगुरूनगर शहरात रिक्षा फिरवून ऑडिओ क्लिपद्वारे जनजागृती केली. तसेच फेसबुक व व्हाॅट्सॲपवरही प्लाझ्मा देण्याबद्दल जागृती करण्यात आली.
प्लाझ्मा देणारे डोनर शोधणे, त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांशी जोडून देऊन भोसरी, पिंपरी-चिंचवड येथील रक्तपेढ्यांमध्ये पाठवून प्लाझ्मादान करून घेऊन प्रत्येक रुग्णाला प्लाझ्मा मिळवून देणे असे काम केले जाते. या टीमने २०० पेक्षा अधिक रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. यातून याबरोबरच ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देणे. रेमडेसिविर इंजेक्शन शासकीय पद्धतीने कसे मिळवता येईल याची माहिती पुरवणे असे काम ही टीम नित्यनियमाने करत आहे. दिवसाला या टीमला २५ पेक्षा अधिक फोन येतात त्यावर काम करून त्यांचा प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे काम ही टीम करत आहे.
प्रतीक जाधव, यज्ञेश सुंबरे, प्रशांत टोपे, श्रेयस प्रभू व तालुक्यातील मोठ्या गावांतील सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याबरोबरच नव्याने कोरोनाबाधित होऊन बरे झालेल्या व्यक्तींची नावेनोंदणीही करून पुढील महिन्यात डोनरची कमी भासणार नाही याचे नियोजन देखील सुरू आहे. तसेच सोमवारपासून प्लाझ्मादात्यास भोसरी व पिंपरी-चिंचवड येथील ब्लड बँकेत ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनाची देखील सुविधा पुरवण्यात येत आहे.
फोटो
प्लाझादान करताना प्राथमिक शाळेच्या शिक्षिका निलिमा मेदगे.