पुणे : म्हातोबा टेकडीवर वन विभागातर्फे काही महिन्यांपुर्वी रोपांसाठी प्लास्टिक जाळ्या आणल्या होत्या. त्यांचे काम झाल्यावर त्या तशाच टेकडीवर पडून होत्या. याविषयी तक्रार केल्यावर त्या एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी टाकल्या आहेत. यावरून वन विभागाचा टेकडीवरील जैवविविधतेबाबतचा निष्काजळीपणा दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नागरिक आभा भागवत व त्यांच्या मुलांनी, इतर नागरिकांनी या प्लास्टिकच्या जाळ्या संकलित करून एका ठिकाणी ठेवल्या होत्या. या जाळ्या मातीत जात असल्याने खूप हानीकारण ठरत होत्या. म्हणून आभा भागवत यांनी त्या संकलित करण्याचे ठरविले. या जाळ्यांचा ढिग केला. त्याबाबत वन विभागाला सांगितले होते. पण त्यांच्याकडून काहीच कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वन्यजीव मानद सदस्य अनुज खरे, पर्यावरण अभ्यासक मानसी करंदीकर, वन्यजीव संशोधक धर्मराज पाटील यांच्याशी आभा भागवत यांनी चर्चा केली. तेव्हा अनुज खरे यांनी लगेच वन विभागाला माहिती दिली. त्या जाळ्या उचलण्याचे त्यांना आश्वासन दिले. पण दोन आठवडे झाले त्या जाळ्या तशाच होत्या. अखेर पुन्हा गुरूवारी वन विभागाशी संपर्क साधला तेव्हा या जाळ्या हलवण्यात आल्या. पण त्या कामगारांच्या घराशेजारी टाकल्या आहेत. कामगारांना याविषयी विचारले असता, त्यांनी त्या जाळणार असल्याचे सांगितले.
जाळू नये रिसायकलिंगला द्यावे
या प्लास्टिकच्या जाळ्या रिसायकलिंगला दिल्या तर, त्याची निसर्गाला हानी होणार नाही. जर त्या जाळल्या तर प्रदूषणात भर पडेल आणि टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होईल. त्यामुळे त्याचे रिसायकलिंग करावे, अशी मागणी भागवत यांनी केली आहे.
जाळणार नाही
प्लास्टिक एका ठिकाणाहून दुसरीकडे सावलीत ठेवले आहे. ते जाळणार नाहीत, अशी माहिती वन परीक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
====================