Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 11:16 AM2020-09-26T11:16:01+5:302020-09-26T16:01:26+5:30
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
बारामती : आरक्षण तत्काळ लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या बारामती येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या ‘वतीने ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थागतीच्या विरोधात बारामतीमध्ये ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात आले. सकाळी आठ वाजता भिगवण रोड वरील पी एन जी चौकातून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आले.होते.यावेळी सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायजर चा वापर करण्यात आला.
आंदोलकांनी भगवा झेंडा घेऊन व एक मराठा लाख मराठा लिहिलेली टोपी घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. चौकातून आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीकडे घोषणाबाजी करत रांगेत जाताना ‘एक मराठा लाख मराठा,आरक्षण टिकवा नाहीतर मराठा समाजाच्या खासदार,आमदार,मंत्र्यांनी राजीनामा द्या, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय’....अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र आले होते.आंदोलकांनी हातात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश व नोकरीत निवड निश्चित करा तसेच कायद्यात टिकणारे आरक्षण द्या असे बॅनर हातात घेतले होते.आंदोलकांनी सहयोग सोसायटीच्या समोर पवार यांच्या निवास्थानासमोर घोषणाबाजी करत ढोलवाजवत आंदोलन केले. जवळपास एक तास आंदोलक येथे ठिय्या मांडून बसले होते.यावेळी सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला.आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावरमोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होते.