पुणे : ऐन वेळी लाईट गेल्याने आणि जनरेटर व्यवस्था बंद पडल्याने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. महानगरपालिकेने वीज बिल थकवल्याने कनेक्शन तोडलयाची चर्चा उपस्थितांमधून ऐकायला मिळाली.
गुरुवारी संध्याकाळी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मनोरंजन संस्थेतर्फे संध्याकाळी 5 वाजता 'चि सौ का रंगभूमी' नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. 1तत्पूर्वी गुरुवारी सकाळपासूनच नाट्यगृहातून वीज गायब होती. त्यामुळे जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ऐन वेळी जनरेटरमध्येही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे नाटकाचा प्रयोग सुरू करायला उशीर होत होता. नाट्यगृहातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडल्याने आणि नाटकाला उशीर होत असल्याने प्रेक्षकांमधून आरडाओरडा सुरू होता, नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा गोंधळ सुरु असतानाच काही वेळातच जनरेटरमधील बिघाड दुरुस्त झाल्याने अर्धा तास उशिराने संगीत नाटक सुरु झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात तांत्रिक बिघाडाचा अडथळा येऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येईल, असे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.