बालरंगभूमी चळवळीचे आधारस्तंभ आणि बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी उद्या (दि. ८) ७१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. तसेच त्यांच्या व्यावसायिक बालरंगभूमीवर प्रयोग सादर करण्याला ५० वर्षे होत आहेत. त्याचे औचित्य साधून ’लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
बालरंगभूमीवर नवनवीन प्रयोग, स्पर्धांची आखणी करून पारखी यांनी बालनाट्य चळवळीला बळकटी दिली. याविषयी ते म्हणाले, चांगली बालनाट्ये निर्मित करायची हाच संस्था स्थापनेमागील उद्देश होता. मात्र, बालनाट्यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचादेखील विकास होतो हे कळल्यानंतर ही चळवळ त्या दिशेकडे वळली. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन यावर अधिकांश भर दिला. त्यानंतर नाट्यछटा चळवळ सुरू केली. कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा, कै. भालबा केळकर नाटुकली स्पर्धा यांबरोबरच कोरोना लॉकडाऊनकाळात आॅनलाइन नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन केले. ‘अभ्यासू नाट्य’ हा अभिनव प्रयोग साकार केला. शासनाच्या अभ्यासक्रम समितीवर काम करीत असताना ‘वर्ग नाट्य’ ही संकल्पना मांडली. सीबीएसएससी आणि केंद्रीय शाळांमध्ये आता नाट्य प्रशिक्षक नेमून नाटक विषय शिकविला जात आहे. मात्र, एसएससी बोर्ड अजूनही ‘माकर््सवादा’ मध्ये अडकले आहे. आता नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये नाटकाचा समावेश केला असल्याचे सांगितले जात आहे.
बालरंगभूमीचे भवितव्य काय? याबद्दल ते म्हणाले, कालपरत्वे मनोरंजन माध्यमांमध्ये अनेक बदल होत गेले. टीव्ही आल्यानंतर आता घरबसल्याच सर्व नाटके पाहायला मिळतील, असे अनेकांना वाटले. पण नाट्यगृहात जाऊन नाटक पाहणे कुणी सोडले का? नाटक बंद पडले नाही तसेच बालनाटयही बंद पडणार नाही. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना उर्जा देणारे हे व्यासपीठ आहे. बालरंगभूमीतून घडलेली मुलेच चित्रपट, मालिकांमधून पुढे येत आहेत.
प्रत्यक्ष नाटक बघणे किंवा सादर करणे याकडे मुलांना पुन्हा वळवायला वेळ लागणार आहे. त्यांच्या मानसिकतेत खूप बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण शाळा सुरू झाल्यावर कदाचित हे चित्र बदलेल अशी आशा करूयात असे ते म्हणाले.
कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या पडद्यामागील सुमारे ४० कलाकार-तंत्रज्ञांना ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाश पारखी यांनी स्वत:कडील ७० हजार रुपयांची भर घालून जीवनावश्यक साहित्याचे ( दि. ७) वाटप केले.
-----------------------------------------------
‘मी नकलाकार’ आत्मचरित्राचे लेखन पूर्ण
माझे ‘मी नकलाकार’ शीर्षकांतर्गत आत्मचरित्र लिहून पूर्ण आहे. सध्याच्या संचारबंदीच्या काळात समारंभ करता येणे शक्य नाही. त्यामुळे प्रकाशक थांबले आहेत. पण लवकरच ते प्रकाशित करू, असे प्रकाश पारखी यांनी सांगितले.
--------------------------------------------