स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच इतरांनाही परवानगी मिळणार; अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:50 PM2021-09-24T18:50:04+5:302021-09-24T18:50:32+5:30
कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागल्यानं निर्बंधह शिथिल करण्यात आले आहेत
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. व्यापार, उद्योग याबरोबरच दुकानांच्या वेळाही वाढवण्यात आल्या आहेत. तर क्रीडांगण, उद्यानं खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्विमिंग पूल खेळाडूंना २ डोसच्या अटींवर परवानगी दिली होती. आता इतर नागरिकांनाही स्विमिंग पूल मध्ये जाता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा दोन डोस चे नियम लागू असतील असं ते म्हणाले आहेत.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांशी साधताना ते बोलत होते. नियम शिथिल कारण्याबरोबरच लसीकरण, शाळा, मास्क, संरक्षण अशा विविद्ध विषयांवर त्यांनी भाष्य केले.
''पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. ग्रामीण भागातही नागरिक आवर्जून लस घेण्यासाठी जात आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी मास्क वापरलं जात नाही. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. सर्वांना मास्कची नितांत गरज आहे. पोलिसांनी याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तशा सूचनाही पोलीस, आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. असंही ते म्हणाले आहेत.''
''पुण्यात १ कोटी लसीकरण पूर्ण झाले आहे. पण रक्ताचं खूप शॉर्टेज जाणवत होत. डॉक्टर, हॉस्पिटलकडूनही मागणी होत होती. मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रक्तदान शिबिरे राबवण्यात आली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढं यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.''
दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार
''केंद्र सरकारनं लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्यानं दोन्ही डोसमधील अंतर वाढवलं होतं. पण आता मुबलक प्रमाणात लसीचा पहिला आणि दुसरा उपलब्ध असल्यानं ८४ दिवसांची गॅप कमी करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांशी चर्चाही करणार असल्याचं अजितदादा म्हणाले आहेत.''