राजू हिंगे
पुणे : महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा भरत असलेल्या १०० इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी शाळांच्या ६० इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणा बसविली हाेती; पण यामधील ५ ते ६ शाळांचीच यंत्रणा सुरू आहे. विशेष म्हणजे पुणे महापालिकेच्या शाळांचे २०१९ नंतर फायर ऑडिटच झालेले नाही. ही बाब ‘लाेकमत’च्या पाहणीत आढळून आली आहे. अग्निशामक यंत्रणेसाठी आवश्यक पाण्याच्या टाक्या, थ्री फेजची वीज यंत्रणा, विद्युत मोटारी नसल्यामुळे ही यंत्रणा धूळ खात पडून आहे. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे.
शहरात महापालिकेच्या प्राथमिक शाळा २६७, तर माध्यमिक शाळा ३९ आहेत. या सर्व शाळा १६० इमारतींमध्ये भरतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडून वरील सर्व इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार होती; पण केवळ ६० इमारतीमध्येच ही यंत्रणा उभारली गेली. परिणाम तब्बल १०० इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नाही.
...म्हणून यंत्रणा पडून
पुणे महापालिकेने सुमारे ६० शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे काम २०१८ मध्ये सुरू केले हाेते, ते २०२० मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. त्यामुळे ही यंत्रणा पडून होती. त्यामुळे या यंत्रणेची दुरुस्ती करण्याची दीड कोटींची निविदा काढली; पण यंत्रणेसाठी आवश्यक पाण्याच्या टाक्या, थ्री फेजची वीज यंत्रणा, विद्युत मोटारी नसल्यामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा पडून आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
पुणे महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या तब्बल १०० इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नाही. इतर ठिकाणी ही यंत्रणात पडून आहे. परिणामी या शाळांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नाही
पुणे महापालिकेच्या ज्या इमारतींमध्ये शाळा भरत आहेत, त्या बहुतांश जुन्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नाही. काही शाळा नवीन इमारतीत भरत आहेत, तेथे अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे. - हर्षदा शिंदे, विभागप्रमुख, भवन विभाग, पुणे महापालिका
अनेक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही ही वस्तुस्थिती
पुणे महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही ही वस्तुस्थिती आहे. सन २०२३-२४च्या अंदाजपत्रकात उपलब्ध तरतुदीनुसार या शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येईल. - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
शहरातील महापालिका शाळांचे चित्र
प्राथमिक शाळा - २६७ माध्यमिक शाळा- ३९ पुणे महापालिकेच्या शाळेतील एकूण विद्यार्थी - ९९, ३२९ नर्सरी - १६, १६९ इंग्रजी माध्यम - २३, ९३९ मराठी - ५१, ९४५ उर्दू - ७, ०९४