पुणे : ‘नाट्यसृष्टीचा संपूर्ण डोलारा हा ‘निर्मात्या’वर उभा असतो. नाटकाच्या आर्थिक नियोजनाची घडी बसविताना निर्माता वेळप्रसंगी तोटा सहन करतो. पण कधी ‘नाटक’ बंद करण्याचा विचार करत नाही. कोरोनाच्या संकटाने नाट्य व्यवसायावर आघात केल्यानंतर निर्माते पडद्यामागच्या कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांना मदतीचा हात दिला. मात्र आता हाच निर्माता आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता सरकारनेच आर्थिक पॅकेज जाहीर करावे, तसेच नाट्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी काही योजना राबवाव्यात, तरच मराठी रंगभूमीची परंपरा पुढेही चालू राहील, अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
--------------------------
निर्मात्यांना सरकारच्या मदतीची गरज
आगामी काळात नाटयसृष्टी सक्रिय ठेवण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. याकरिता मी काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामधली पहिली बाब म्हणजे, नाट्यगृह भाड्यात दिलेली सवलत डिसेंबर २०२२ पर्यंत असायला हवी. कारण नाटक कधी सुरू होईल, हे सांगता येणार नाही. पुढचे पावसाळ्याचे चार महिने, सण उत्सव, लोकांची मानसिकता लक्षात घेता नाटक सुरू होण्यास नोव्हेंबरचा काळ उजाडेल. गाड्यांच्या पार्किंगसाठी हक्काची जागा हवी, कारण एका बसमागे महिन्याला चार हजार रूपये भाडे आकारावे लागते. नेपथ्यासाठीही सुरक्षित जागा मिळावी. टोलमाफी झाल्यास त्याचा फायदाही निर्मात्यांना होईल. सरकारी अतिथीगृह नाट्यकर्मींना सवलतीच्या दरात मिळाले तर त्याचाही दिलासा मिळेल. निर्मात्यांचे रखडलेले अनुदानही तातडीने मिळायला हवे.
- प्रशांत दामले, अभिनेते-निर्माते
----------------
सरकारने आर्थिक पँकेज जाहीर करावे
गेल्या वर्षी निर्मात्यांनी नाट्यनिर्मितीसाठी कर्ज काढले. त्याचे व्याज फेडायला निर्मात्यांना अजून कर्ज काढावे लागणार आहे. अशी अवस्था आहे. कोरोना अजून असल्याने उपासमारी अधिक वाढणार आहे. सरकारने पडद्यामागील कलाकार आणि तंत्रज्ञांसह नाट्य निर्मात्यांनाही आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे. नाटय निर्मात्यांसह कलाकार, दिग्दर्शक आणि लेखकही नाटकावरच अवलंबून असतात . मात्र आता नाटय व्यवसाय ठप्प असल्यामुळे सर्वांना आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. मुंबईत ६० ते ७० तर पुण्यात ३० ते ४० नाटयनिर्माते आहेत. एका प्रयोगासाठी ७० हजार ते १ लाख रुपये खर्च येतो. सध्या एवढे नुकसान निर्मात्यांना सहन करावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नाटकांसाठीचे अनुदानही वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाही अनुदान वेळेवर मिळेल असे वाटत नाही.
- राहुल भंडारे, प्रमुख कार्यवाह, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ
----------------
निर्मात्यांनी जोडधंद्याकडे वळण्याशिवाय गत्यंतर नाही
कोरोनाची दुसरी लाट कमी झाली आणि शासनाने नियम शिथिल केले, तरी प्रेक्षक नाटकांकडे वळतील का? हा निर्मात्यांसमोरचा प्रश्न आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर पडद्यामागचे कलाकार हे दुसऱ्या व्यवसायाकडे वळले. पण निर्मात्यांना याचा अंदाज आला नाही. डिसेंबर 2020 मध्ये सर्व सुरू झाल्यानंतर दिलासा मिळाला होता. मात्र फेब्रुवारीमध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने नाट्य व्यवसाय ठप्प झाला. यापुढील काळात निर्मात्यांना तग धरणे अवघड झाले आहे. त्यामुळे निर्मात्यांना नवीन व्यवसायातच शिरावे लागणार आहे. काही निर्मात्यांनी दुसऱ्या व्यवसायाकडे वळण्याचा देखील विचार सुरू केला आहे. त्याशिवाय आता इलाज नाही.
- भाग्यश्री देसाई, निर्मात्या
-----------------------------------