पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मोटार पंक्चर झाल्यास अथवा बिघाड झाल्यास तात्काळ महामार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. परंतू, खरोखरीच वेळेत मदत पोहचते का याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. काही महिन्यांपुर्वी एका कुटुंबाच्या गाडीचे चाक द्रुतगती मार्गावर पंक्चर झाले होते. या कुटुंबाने हेल्पलाईनवर संपर्क साधताच अवघ्या दहा मिनिटात त्यांना मदत आणि मॅकेनिक उपलब्ध झाला. हा सुखद अनुभव ज्येष्ठ पत्रकार सुरेशश्चंद्र पाध्ये यांनी ' लोकमत' ला सांगितला. दोन दिवसांपुर्वी झालेल्या अपघातात प्रसिद्ध मणका विकार तज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांच्यासह मोटारचालकाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या विविध कारणांवर चर्चा सुरु आहे. परंतू, महामार्ग पोलिसांकडून आपत्कालीन परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या मदतीची उदाहरणे लोकांना माहिती पडत नाहीत. पाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मित्र सचिन देशपांडे (नाव बदलले आहे) २० मार्च २०१९ रोजी मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरुन कुटुंबासह प्रवास करीत होते. पुण्याकडे जात असताना लोणावळ्याच्या पुढे त्यांच्या मोटारीचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांना गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करावी लागली. रात्रीचे आठ वाजलेले होते. त्यावेळी वाहतूकही वेगात सुरु होती. मित्राने कुटुंबियांना मोटारीच्या बाहेर काढून दूर जाऊन उभे राहण्यास सांगितले. मोटारीचे पार्किंग लाईट चालू करुन त्यांनी 9822498224 या हेल्पलाईनवर फोन केला. त्याला तात्काळ उत्तर देत आयआरडीबीचे दोन प्रशासकीय कर्मचारी दहा मिनिटांच्या आत तेथे पोचले. सचिन यांच्या चालकाकडे टायर बदलण्याचे साहित्य नव्हते. आयआरडीबीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मॅकेनिक बोलावून घेतला. वास्तविक त्या दिवशी होळी असूनही ही सर्व मदत उपलब्ध झाली होती. या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेकरिता मोटारीपासून काही अंतरावर ऑनसाईन बोर्ड लावला. तसेच एक माणूस दूरवर टॉर्च घेऊन उभा केला. दरम्यान, मॅकेनिकने त्यांच्या मोटारीचे चाक बदलून दिले.
========उपयुक्त माहितीद्रुतगती मार्गावर जागोजाग रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाच्या दगडांवर नंबर कोड दिलेले आहेत. प्रत्येक दहा फुटांवर या दगडांवर ६३ आणि १०० अशा स्वरुपाचे दोन अंक लिहिलेले असतात. ६३ ही संख्या म्हणजे द्रुतगती मार्गाच्या प्रारंभापासूनचे अंतर दर्शविते. तर १०० किलोमीटरपर्यंत पोचल्यानंतर १०० अंतर दर्शविले जाते. रस्त्याच्या समाप्तीपर्यंत हे कोडींग सुरु राहते. क्रमवारीत किलोमीटर आणि त्यानंतरच्या पायांमध्ये अंतर दिलेले असते. हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर त्यांना आपले अचूक ठिकाण समजण्याकरिता या कोडचा उपयोग होतो. त्यानुसार, मदत पोचविणे अधिक सोईचे होते.