पुणे : पुणे आणि मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. या शहरांमध्ये रेड झोनची संख्या देखील सर्वाधिक आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरांतून गावाला जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तब्बल चाळीस हजारांपेक्षा जास्त पुणेकर नागरिक पुणे जिल्हयांतील वेगवेगळ्या तालुक्यातील आपआपल्या गावी गेली आहेत. सध्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबईकडून देखील गावाकडे परतणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गावातील लोकांनी बाबांनो, आमच्यावर उपकार करा, पण कोणत्याही परिस्थितीत गावाला येऊ नका, असे मेसेज आपल्या नातलगांना पाठवून त्यांना गावी न येण्याविषयी विनंती केली आहे. यासाठी गावातील तरुण कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतला आहे. यात खासक रुन पुणे आणि मुंबईवरुन गावी परतणाऱ्या व्यक्तींना समजून सांगितले जात आहे. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गावपातळीवरुन विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यात सर्वांना सहभागी करुन घेतले जात आहे. विशेषत: पुण्याहून (त्यात रेड झोन मधून गावी येणा-या) आलेल्या व्यक्तीची चौकशी केली जाते. गावी आल्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवली जात आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र या सगळयात गावातील शांतता आणि शिस्त याचा कुठेही भंग होणार नाही याची गावकरी मंडळीकडून घेतली जात आहे. तरुणांऐवजी गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी पुण्या-मुंबईवरुन येणाऱ्या व्यक्तींची समजुत घालण्याचा प्रयत्न केला आहे.
................................................पुणे आणि मुंबई नावाची दहशत गावात कुणी बाहेरगावावरुन आल्यास तात्काळ त्याची चौकशी करण्यात येते. संबंधित व्यक्ती पुणे आणि मुंबईची आहे असे कळल्यास तातडीने त्या व्यक्तींशी संपर्क साधला जातो. त्याच्या कुटूंबियांना अगोदर माहिती का दिली नाही याविषयी विचारणा करण्यात येते. सध्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, आळेफाटा, या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील इतर तालुक्यांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढीस लागल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.
....................................... यादी तयार आहे...दररोज पुणे आणि मुंबईवरुन गावात कोण आले आहे याची स्वतंत्र विभागनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी गावातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत घेतली जात आहे. शक्यतो पुणे आणि मुंबईवरुन गावाला येणा-या व्यक्तींनी गावाला येण्याचे टाळावे यासाठी त्या व्यक्तींच्या घरच्यांना समजावले जात आहे. सर्वजण सहकार्य करत आहेत. कुठलीही अडचण आल्यास याकामी पोलिसांचे सहकार्य घेतले जात आहे. याकामी गावातील तरुण कार्यकर्ते एकजुटीने काम करत असल्याने येणारे संकट दूर करण्यास त्याची मदत होत आहे. - गौरव डुंबरे ( कार्यकर्ता, ह्णमी ओतुरकरह्ण आपत्ती व्यवस्थापन मंच)