पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत व्यक्त करीत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी असे आम्हाला वाळीत टाकू नये, आम्हालाही सन्मानाने संमेलनात बोलवावे, सहभागी करून घ्यावे, अशी आर्त विनंती आयोजक संस्थेला केली आहे.यंदा बडोदे येथे होणा-या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या रिंगणात देशमुख यांच्यासह राजन खान, रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, किशोर सानप असे तब्बल 5 उमेदवार उतरले होते. मतमोजणीदरम्यान लक्ष्मीकांत देशमुख आणि रवींद्र शोभणे यांच्यात चांगलीच लढत झाली. यामध्ये देशमुख यांनी शोभणे यांचा 70 मतांनी पराभव करीत संमेलनाध्यक्षपदावर आपले नाव कोरले. निवडणुकीप्रमाणेच एकमेकांवर कोणतेही आरोप-प्रत्यारोप न करता अपयशही पराभूत उमेदवारांनी अत्यंत खेळीमेळीने घेतले.पराभूत उमेदवारांशी ’लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी आजवरच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांना संमेलनाला निमंत्रित केले जात नाही, याकडे रवींद्र शोभणे यांनी लक्ष वेधले. एक चांगला आणि बाकीचे वाईट असे कुणाला वाटायला नको, त्यामुळे पराभूत उमेदवारांनाही सन्मानाने संमेलनात सहभागी करून घ्यावे असे ते म्हणाले.----------------------------------------लक्ष्मीकांत देशमुख हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. जिंकायला 70 मते कमी पडली तरी आमच्या दोघांमधील स्पर्धा ही निकोप राहिली. शेवटी यश-अपयश ठरलेले असते. पाचपैकी कुणीतरी एकच निवडून येणार हे गृहीतच असते. मात्र पराभूत उमेदवारांना संमेलनाला निमंत्रित केले जात नाही याचे वाईट वाटते. आयोजक संस्थेने असे वाळीत टाकू नये- रवींद्र शोभणे, साहित्यिक----------------------------------------अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे अभिनंदन. निवडणुकीतील यशापयश हे माझ्या जीवनाचे लक्ष्य नाही. मी जी आश्वासने दिली होती ती लवकरच पूर्ण करणार आहे. मी काहीही गमावले नाही. उलट मला अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आत्मबळ मी कमावले आहे. मला अंतर्बाह्य माणसं कळली. माणसं कळणं आणि वळणं हेच प्रतिभावंताचं धन आहे. तेच मी व्रतस्थपणे माझ्या लेखनातून मांडणार आहे. मला खूप खूप नवनवीन पात्रं गवसली हे प्रातिभ धन मी जगाला देणार आहे- किशोर सानप, साहित्यिक---------------------------------------संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांचे अभिनंदन. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना ज्या गोष्टींवर भर दिला होता, ते काम पुढे तसेच चालू राहील. मात्र महाराष्ट्रासह सगळीकडूनच मते कमी कशी पडली, याचेच आश्चर्य वाटत आहे. निवडणुकीत एकगठ्ठा मतदान होणे, मतपत्रिका गोळा करणे हे प्रकार नेहमीच घडताना दिसतात. या गोष्टी आता हळूहळू पुढे येऊ लागल्या आहेत. भविष्यात याला नक्कीच आळा बसेल- रवींद्र गुर्जर, साहित्यिक
आम्हालाही संमेलनात सहभागी करून घ्या, पराभूत उमेदवाराची आयोजक संस्थेला आर्त विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 9:43 PM