पुणे : पुण्यातील हजारो मजूर रस्त्यावर आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे सगळ्यांनी आपली नोकरी गमावली. यातील अर्धेअधिक मजूर हे हॉटेल व्यवसायातील आहेत. या सर्व मजुरांची आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे की शौचास जाण्यासाठी लागणारे पाच रुपयेही त्यांच्या खिशात नाही. काही मजूर तर दिवसदिवस फक्त पाण्यावर काढतात. फुटपाथवर झोपले असताना काहींची पाकीटेही चोरीस गेली आहेत. पुण्यातील हे मजूर महाराष्ट्रभरातून विशेषतः सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, वर्धा, बीड येथून आले आहेत. त्याचबरोबर अनेक जण दार्जिलिंग, उत्तर प्रदेश, बिहार या भागातूनही आले आहेत. हॉटेल व्यवसाय, छोटी दुकाने, हमाली काम करणारे हे मजूर आहेत. निर्बंधांमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, कॅफे, इव्हेंट्स, लहानसहान दुकाने सगळंच एकाएकी बंद करावं लागलंय. जोपर्यंत सुरू होतं तोपर्यंत मालकानं राहायला जागा आणि पगार दिला खरा, पण आता मालकाच्याच कामाला कुलूप लागल्यानं त्याच्याकडचे सगळे मजूर त्यानं काढून टाकले. ज्याचा परिणाम म्हणजे पुण्यात सध्या काही जागा मजुरांचे अड्डे झाल्या आहेत. शनिवारवाडा, महाराणा प्रताप गार्डन, स्वारगेट सर्कल, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा काही जागा मिळून जवळपास हजारच्या आसपास मजूर रस्त्यावरच राहत आहेत.
हे मजूर अजुनही कामाच्या शोधात आहेत, तर काहींना घरी जायचंय पण पैसे नाहीत, म्हणूनही काम शोधताहेत. निदान दोन वेळचं अन्न आणि डोक्यावर छत एवढीच या मजुरांची गरज.
सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन
गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊन लागला त्यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या होत्या. मात्र, सध्या हे चित्र अभावानेच दिसत आहे. नगर जिल्ह्यातील तीन कामगार दोन दिवसांपासून उपाशी होते. त्यांच्याकडे गावी जाण्यासाठीही पैसे नव्हते. भोई प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मिलिंद भोई यांनी त्यांची जेवणाची आणि गावी जाण्याची व्यवस्था केली. डॉ. भोई म्हणाले, व्यवहार सुरू झाल्यामुळे अनेक मजूर पुन्हा पुण्यात कामधंद्यासाठी आले आहेत. दोन-तीन महिन्यांतच पुन्हा उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे सेवाभावी संस्थांनी त्यांना मदत करणे गरजेचे आहे.