पुणे : ‘‘वाघनखं भारतात आणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नांगर तुमच्या सुपीक डोक्यातून फिरवा. कारण वाघनखांपेक्षा शिवरायांचे विचार हे अधिक धारदार आहेत. शिवरायांच्या विचारांच्या नांगराचा फाळ घ्या आणि आपले बंजर डोकी नांगरून टाका,’’ असे आवाहन ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले.साहित्य अकादमी व साधना ट्रस्टच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात कवी वसंत बापट जनशतवार्षिकी परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी साहित्यिक भारत सासणे, साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव, नरेंद्र पाठक, विनय हर्डीकर उपस्थित होते. उद्घाटनसत्रानंतर प्रथम सत्र प्रमोद मुनघाटे, इंद्रजित भालेराव, किशोर कदम, नीलिमा गुंडी यांचे झाले.
पाटील म्हणाले,‘‘१९९९ मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवीराज वसंत बापट होते. तेव्हा त्यांचा एका ठिकाणी होता. तेव्हा लेखक व स्वातंत्र्या या विषयावर खडे बोल सुनावले होते. ते म्हणाले, सरकारने जरी संमेलनाला २५ लाख रूपये दिले असले, तरी आम्ही आमचा आत्मा विकणार नाही. त्यांनी २५ लाख काय २५ कोटी दिले तरी आम्ही आमचा आत्मा विकायला काढलेला नाही, अशा कणखर विचारांचे बापट होते. बापट यांचे मराठीवरील प्रीती आणि प्रेम अचाट होते.’’टीचभर समीक्षकांचे बोलणं गैर-
‘‘वसंत बापट यांच्यावरी कार्यक्रमासाठी मला साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांचा फोन आला. ते म्हणाले, वसंत बापट यांच्या कार्यक्रमासाठी दोन-चार समीक्षकांना फोन केले. परंतु, त्यांनी यायला नकार दिला आणि एक दबक्या आवाजात सांगितले की, वसंत बापट हे काय कवी आहेत ? किमान पाडगावकरांच्या दर्जाचे असते तरी आम्ही वेळ घालवला असता. असं जर सो कॉल्ड टीचभर समीक्षक बापटांविषयी बोलत असतील, तर हे गैर आहे. ’’ यामुळे मला झोप लागली नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला खास बोलायला आलो, असे विश्वास पाटील यांनी सांगितले.