शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरील पार्किंगला रेल्वे प्रशासनाने प्रिमियम दर्जा देऊन ठेकेदाराच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची कोट्यवधींची लूट सुरू आहे. प्रत्यक्षात प्रिमियम पार्किंगसाठी आवश्यक असलेली कोणतीच सुविधा स्थानकावर नसताना पार्किंग शुल्काचे पैसे मात्र तासातासाला वाढवून घेतले जात आहेत. पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध तक्रारी येऊनही रेल्वे प्रशासनाकडून एकाच ठेकेदाराला वर्षांनुवर्षे ठेका दिला जात आहे. मुख्य रेल्वे स्थानकानजीक महात्मा गांधी यांच्या पुतळ््याजवळ, बसस्थानकाजवळ तसेच ताडीवाला रस्त्यावरील अशा ३ जागा पार्किंगसाठी राखीव ठेवल्या आहेत. पार्किंगचे नियमन व्यवस्थित होऊन रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने त्या ठेकेदारांना चालविण्यासाठी दिल्या जात होत्या. ठेकेदारांनी वाहनचालकांकडून नाममात्र शुल्क घेऊन त्याची व्यवस्था पाहावी, असे अपेक्षित होते. मात्र, सध्या पार्किंगच्या या जागा रेल्वेतील अधिकारी व ठेकेदार यांचे पैसे कमाविण्याचे साधन बनले आहे. रेल्वे स्थानकावरील तिनही पार्किंगचा ठेका सय्यद अफसर इब्राहीम यांना दिलेला आहे. त्यातील महात्मा गांधी पुतळ्याजवळच्या पार्किंगला प्रिमियम पार्किंगचा दर्जा रेल्वेने दिला आहे. त्यानुसार, ठेकेदार सय्यद अफसर इब्राहीम यांच्याशी ७ आॅगस्ट २०१७ पर्यंत करार झाला आहे. त्यानुसार दुचाकीसाठी ६ तासांकरिता २० रूपये व चारचाकीसाठी ४ तासांकरिता २० रूपये शुल्क आकारण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. त्याबदल्यात रेल्वेला दरवर्षी १ कोटी २६ लाख ५ हजार रूपये ठेकेदाराकडून मिळणार आहेत. लोकहित फाऊंडेशनचे अजहर खान व मेहजबीन शेख यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळविली आहे. वस्तुत: फाइव्ह स्टार हॉटेल, मॉलमध्ये ज्या दर्जाच्या पार्किंग सुविधा दिल्या जातात त्या प्रिमियम पार्किंगमध्ये देणे अपेक्षित आहे. त्यामध्ये पार्किंग बंदिस्त असावे, वाहने लावण्यासाठी त्याठिकाणी मूबलक जागा असावी, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा, कर्मचाऱ्यांनी वाहने लावावीत आणि काढून द्यावीत या सुविधा प्रिमियम पार्किंगमध्ये देणे बंधनकारक आहे. त्याउलट परिस्थिती रेल्वे स्थानकावरील पार्किंगमध्ये दिसते. वाहने लावण्यासाठी अत्यंत अपुरी जागा आहे.
पार्किंगमधून कोट्यवधींची लूट
By admin | Published: April 22, 2015 5:43 AM