पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात दारूच्या पार्ट्या होत असल्याचा घटना गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. परंतु, विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांकडूनच गृह विभागाच्या खोलीमध्ये दारूच्या पार्ट्या रंगत असल्याची धक्कादायक माहिती विद्यापीठाच्या कुलसचिवांनी छापा टाकून जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांवरून समोर आली आहे.विद्यापीठाच्या खडकी गेटकडे जाणाऱ्या झाडीमध्ये तसेच सेवक विहाराच्या सभागृहाजवळ दारूच्या पार्ट्या झाल्या होत्या. त्या संदर्भातील माहिती समोर आल्यानंतर विद्यापीठातर्फे चौकशी समिती नेमण्यात आली. परंतु, समितीचा अहवाल विद्यापीठात प्राप्त होऊनही दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता विद्यापीठाच्या चारचाकी वाहनचालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या खोलीमध्येच दारूच्या पार्ट्या होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थावर व गृह विभागाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येत असल्यामुळे बऱ्याच कालावधीपासून या पार्ट्या होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू म्हणाले, की गृह विभागाच्या वाहनचालकांच्या खोलीमध्ये दारूच्या पार्ट्या होत असल्याची माहिती समजल्यामुळे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मी स्वत: सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊून येथे छापा टाकला. त्यात काही दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, या दारूच्या बाटल्या कोणाच्या आहेत. याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. परंतु, घडलेल्या प्रकाराची विद्यापीठ प्रशासनातर्फे चौकशी करून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.विद्यापीठात १७ ते १८ वाहनचालक आहेत. विद्यापीठाच्या कामासाठी रात्री-अपरात्री त्यांना परगावी जावे लागते. काही वेळा रात्री उशिरा त्यांना विद्यापीठात परतावे लागते. त्यामुळे प्रशासनाने त्यांना आराम करण्यासाठी ही खोली उपलब्ध करून दिली आहे. परंतु, या खोलीत चुकीचे प्रकार घडत असल्याची माहिती समजल्यामुळे डॉ. कडू यांनी गुरुवारी सकाळी येथे छापा टाकला. त्याचप्रमाणे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्व वाहनचालकांना बोलावून कडू यांनी त्यांची कानउघाडणी केली.
विद्यापीठात तळीरामांचा अड्डा
By admin | Published: February 06, 2015 12:26 AM