लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरीप हंगामातील पिकांसाठीची पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना हप्त्याचे फक्त २ टक्के द्यावे लागणार असून उर्वरित पैसे केंद्र व राज्य सरकार भरणार आहे.
विमा उतरवणे ऐच्छिक आहे. त्यात पिकाच्या नुकसानीची ७० टक्के जोखिम घेण्यात येईल. विमा संरक्षित रक्कम, त्यावर आधारित प्रति हेक्टरी एकूण हप्ता, त्याचा शेतकऱ्याचा हिस्सा व केंद्र, राज्य सरकार देणार असलेली रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पीकनिहाय तसेच तालुकानिहाय रक्कम वेगवेगळी आहे.
हवामानातील आकस्मिक बदल, नैसर्गिक आपत्ती व अन्य काही निकषांमध्ये झालेले नुकसान विमा उतरवलेला असेल तर तपासणीअंती नुकसान भरपाई मिळेल. यासाठीच्या विमा कंपन्याही निश्चित असून त्यांना तालुके नियुक्त करून देण्यात आले आहेत. अंतिम मुदत १५ जुलै आहे. अधिक माहितीसाठी तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.