पुणे : ‘भले देऊ कासेची लंगाेटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हा जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग हस्तलिखित पगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा देहूत सन्मान करण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीची रेशमी कापडापासून बनवलेली ही आकर्षक पगडी देहू संस्थानच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी तयार केली आहे.
पंतप्रधान मोदी हे १४ जून रोजी देहू संस्थानला भेट देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी खास तुकाराम पगडी आणि उपरणे बनविण्यात आले आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी यामध्ये पारंपरिक संप्रदाय पद्धतीने तुकोबांच्या अभंगातील विचार "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी‘ अशा अभंगातून हस्तलिखित गाथा पगडीच्या मध्यभागी आहे. ही पगडी घातल्यानंतर कपाळावर टिळा दिसणार आहे. तसेच, मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा आणि उजव्या व डाव्या बाजूला संत ज्ञानोबा व तुकाराम महाराजांची छोटीशी प्रतिमादेखील आहे. तर, उपरण्यावर हिंदी- मराठीत हस्तलिखित अभंग आहेत.
दाेन पगड्या तयार करण्यात आल्या असून, साधी पगडी ही देहूत आल्यानंतर तर डिझायनर पगडी ही मुख्य कार्यक्रमात त्यांना देण्यात येणार आहे. या पगडीला तुळशीच्या माळांची सजावट, टाळ, चिपळ्या, मृदंग इ. प्रतिमा असून, वैशिष्ट्ये असलेली पगडी आकर्षक दिसत आहे.
जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांची देशाला गरज आहे. त्यादृष्टीने ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांचे विचार होते तशी विचारांची पगडी बनवली आहे. पारंपरिक पद्धतीने या पगड्यांवर हस्तलिखित गाथा लिहिली असून, या माध्यमातून संपूर्ण जगात तुकोबांचे विचार पोहोचवण्याचा मानस आहे. तीन पिढ्यांपासून व्यवसाय असून, ही पगडी बनवण्यासाठी पंधरा दिवस लागले आहेत.
- गिरीश मुरूडकर, फेटेवाले