पिंपरी :
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा पाच टप्प्यात, तर संत तुकाराम पालखी मार्गाचा तीन टप्प्यात विकास होणार आहे. सर्व टप्प्यात साडेतीनशे किलोमीटर लांबीचे महामार्ग बनणार आहेत. त्यावर ११ हजार कोटी खर्च होणार आहेत. यातून विकासालाही गती मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहूगाव येथे केले.
देहूगाव येथील संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या वतीने उभारलेल्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माळवाडी येथील लष्कराच्या मैदानावरील वैष्णव संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, देहू देवस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, वारकरी संप्रदाय भूषण मारुतीबुवा कुऱ्हेकर, भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांना देहू देवस्थानाच्या वतीने पगडी परिधान करण्यात आली. त्यानंतर उपरणे, तुळशीहार घालून वीणा भेट देत सत्कार केला. पंढरपूर देवस्थानाच्या वतीने गहिनीनाथ महाराज औसेकर आणि आळंदी देवस्थानचे योगेश देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
‘विठ्ठलाय नम: नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा-नमो सद्गुरू सच्चिदानंद रुपा’ अशी वैष्णव संवादाची सुरुवात पंतप्रधानांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
शिवरायांच्या जीवनात तुकोबांची भूमिका महत्त्वाचीछत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रनायकाच्या जीवनात संत तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका होती. वेगवेगळ्या कालखंडातील युगपुरुषांना संत तुकाराम महाराजांच्या वाणीने ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. धार्मिकस्थळांवरील यात्रा या सामाजिक, आध्यात्मिक वृद्धीसाठी ऊर्जास्रोत आहेत. एक भारत, श्रेष्ठ भारत भावनेला जिवंत ठेवण्याचे काम त्या करत आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थाचा विकासही केला जात आहे. बाबासाहेबांचे जन्मस्थळ, लंडनचे घर, मुंबईची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमीचा विकास केला जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.
...अन् मोदी झाले वारकरी!देहूगाव येथील संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या वतीने उभारलेल्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करताना देहू देवस्थानाच्या वतीने त्यांना संत तुकाराम महाराजांची पगडी घातली.
सर्वात दुर्लभ संतांचा सत्संगदेहू ही संतशिरोमणी व संत तुकारामांचे जन्मस्थान आणि कर्मभूमीही आहे. शास्त्रामध्ये म्हटले आहे की, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची अनुभूती झाली की देवाची अनुभूती आपोआप होते. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान
संत, क्रांतिकारकांचे दिले दाखले- मोदी यांनी वीस मिनिटांच्या भाषणांतून उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. - तुकोबारायांच्या अभंगांचे दाखले देत महाराष्ट्रातील वारकरी संतपरंपरा, त्यांचे तत्त्वज्ञान, अध्यात्माचे महत्त्व, अभंगांतून शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मिळालेली प्रेरणा, संतांच्या विचारांच्या आधारे देशाची वाटचाल यावर भाष्य केले.
अभंग ऊर्जा देत मार्ग दाखवतात ‘‘संत तुकाराम हे समाजच नाही तर भविष्यासाठीही आशेचे किरण आहेत. त्यांनी आपल्या संपत्तीला लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. ही शिळा त्यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. त्यांच्या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो शाश्वत राहतो तो अभंग असतो. त्यांचे अभंग आपल्याला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत, असे मोदी म्हणाले.
शिळा ही भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळामोदी म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांचा त्याग व समर्पणाची साक्ष असलेली शिळा ही भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. हे शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही, तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करते. देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात देश आणि समाजाला दिशा देण्यासाठी युगपुरुष, महान आत्मा जन्म घेत आहे. अशा महान विभूतींनी आपल्या शाश्वततेला सुरक्षित ठेवत भारताला गतिमान बनवले आहे.’’ साखळदंडांच्या चिपळ्या करून सावरकरांनी तुकोबांचे अभंग गायले- संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा महिमा सांगताना स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाचे दाखले पंतप्रधान मोदी यांनी दिले. - मोदी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानाच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या करून तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले. अभंग हे जेवढे भागवतभक्तासाठी, तेवढेच ते राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वाचे आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग प्रेरणादायी, समानतेची शिकवण देणारे आहेत.- संत तुकाराम महाराजांचे अभंग समाजासाठी युगपुरुषांचे प्रेरणास्थान आहेत, याची अनेक उदाहरणे मोदी यांनी वैष्णव संवादात दिली. - महाराष्ट्रातील संत परंपरा, शिवरायांसाठी प्रेरणास्थान, संतांजी महाराज जगनाडे, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे चिंतनस्थळ म्हणून तुकोबांचे अभंग प्रेरक आहेत, अशी उदाहरणे मोदी यांनी दिली.
स्वातंत्र्यलढ्याला मर्यादित का करायचे? : माेदी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी साधने वेगवेगळी होती पण, लक्ष्य एकच होते. अनेकांच्या सामूहिक प्रयत्नांतून स्वातंत्र्य मिळाले. कळत-नकळत त्याबाबतचे योगदान आपण मर्यादित का करायचे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राजभवनातील समारंभात केला.