पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी ४.४५ वाजता 'कोव्हीशिल्ड' या कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या 'सिरम' इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसची निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. या सव्वा तासांच्या भेटीनंतर मोदी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळाकडे निघाले. पुणे विमानतळावरून ते नंतर दिल्लीला रवाना होणार आहे. या भेटीनंतर आदर पूनावाला हे संध्याकाळी ७ वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहे. या पत्रकार परिषदेत पूनावाला महत्वाची माहिती देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसची निर्मिती करणाऱ्या अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि त्यानंतर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आहे. यावेळी सायरस पुनावाला,आदर पुनावाला आणि नताशा पुनावाला यांनी अभिवादन करत मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर आदर पुनावाला यांनी सिरमने आजवर तयार केलेल्या लसींचे डिजिटल सादरीकरण मोदींना दाखवले.
या भेटीत मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटकडून तयार होत असलेल्या कोव्हिशिल्ड लस बाबतची संपूर्ण माहिती घेतली. तसेच सायरस पुनावाला, आदर पुनावाला यांच्यासह सिरम इन्स्टिटयूटमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली.या भेटीत शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरोना लस स्टोअर करण्याच्या दृष्टीने उभे करावे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सीरमशी सरकारला लस वितरणाच्या दृष्टीने करावा लागणारा खर्च याविषयीही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अवघ्या जगाचे कोरोनावरील लसकडे डोळे लावून वाट पाहत आहे. त्यामुळे कोविशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या 'सिरम'ला इन्स्टिटयूटला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तसेच जगातील सर्वात मोठी लस उत्पादनाची क्षमता ही सीरमकडे आहे. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्याचे हक्क मिळवले आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा महत्वपूर्ण होता. अगदी तासाभराच्या कालावधीचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
ही कोरोनाची लस लोकांपर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकते आणि कोणत्या माध्यमातून पोहोचू शकते हे कदाचित या दौऱ्यानंतर स्पष्ट होऊ शकेल. कारण ही कोरोना लस कुणाला मोफत उपलब्ध होईल का? किती कालावधीत ही लस उत्पादित होईल? किती प्रमाणात उत्पादित होईल? याची उत्तरं कदाचित पंतप्रधानांच्या या सीरम इन्स्टिट्यूटच्या दौऱ्यानंतर मिळू शकतील. सिरम इन्स्टिटयूटच्या सव्वा तासांच्या भेटीनंतर दौऱ्यानंतर पंतप्रधान थेट दिल्लीला रवाना झाले आहे.