पुणे : पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल म्हणून काही मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि.१) सदाशिवपेठ, शनिवारपेठ आणि नारायण पेठ येथे असणाऱ्या काही शाळांनी विद्यार्थ्यांसाठी सुट्टी घोषित केली आहे. सुट्टी घोषित केलेल्या शाळांमध्ये ज्ञानप्रबोधनी, न्यू इंग्लिश स्कूल, अहिल्यादेवी हायस्कुल या शाळांचा समावेश आहे. तर, काही शाळांनी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे क्लास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी पुण्यात आगमन होणार आहे. त्यामुळे सोमवारीच पंतप्रधानांचा दौरा असणाऱ्या ठिकाणी मॉकड्रीलसाठी रस्ते बंद करण्यात आले होते. त्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सदाशिवपेठ, नारायण पेठमधील शाळेच्या विद्यार्थ्यांना बसला. ट्रॅफिकमधून शाळेत पोहचण्यात रिक्षावाल्या काकांना उशीर झाला तर, काही ठिकाणी मुले शाळेची तयारी करुन बसले असताना त्यांचा पालकांना मेसेज करत रस्ते बंद असल्याने आपण येणार नसल्याचे रिक्षावाल्या काकांनी कळवले. त्यामुळे पालकांना मुलांना घेऊन शाळा गाठावी लागली. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर रस्ताबंद असल्याची माहिती शहराच्या उपनगरातून येणाऱ्या रिक्षाचालकांनी मुलांच्या पालकांना कळवले. तर, जे रिक्षा, व्हॅनचालक विद्यार्थ्यांना घेऊन आले होते. त्यांना वाहतूक बदलामुळे कोंडीचा सामना करावा लागला.
दोन चौकांमध्ये लागला एक तास
स्कुलव्हॅनने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे गणेश ढम यांनी सांगितले की, सहकारनगर, धनकवडी, बिबवेवाडी यापरिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना टिळक रोड बंद केल्याने पर्यायी रस्ता म्हणून शास्त्रीरोडने आलो. मात्र, सर्वच वाहतूक या मार्गावर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एका चौकातून दुसऱ्या चौकात जाण्यासाठी तब्बल एक तास लागला. विद्यार्थ्यांना परत घेऊन जाताना देखील मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घेण्यासाठी आले होते.
काही शाळांनी केली सुट्टी घोषित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी पुण्यात आगमन होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी ११ च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मोदींचा दौरा सुरू होणार आहे. त्यावेळी त्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काही अडचणी येऊ नये. म्हणून काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. सदाशिव पेठ, शनिवार पेठ आणि नारायण पेठ येथे असणाऱ्या ज्ञानप्रबोधनी, न्यू इंग्लिश स्कूल, अहिल्यादेवी हायस्कुल या शाळांचा समावेश आहे.