पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात कडक सूचना पुणे पोलिसांना देण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटनांकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय शहरात यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले, २०१० साली जर्मन बेकरी, २०१२ साली जंगली महाराज रोड आणि २०१४ साली विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या आवारात झालेले साखळी बॉम्बस्फोट यासह देशात इतर ठिकाणी चाललेल्या अतिरेकी संघटनांच्या कारवायांचा विचार करता पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था सतर्क करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पाेलिसांना मिळाल्या या सूचना
१) दि. ०७ ते १२ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या हद्दीतील हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा व इतर सार्वजनिक ठिकाणे चेक करून तेथील व्यक्तींची शहानिशा करावी.२) चेकिंगमध्ये मिळून येणारे आक्षेपार्ह वस्तू व स्फोटके, दारूगोळा शस्त्रे व इतर घातक वस्तू किंवा अन्य संशयित वस्तू आढळून आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.३) आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जातीयवादी गुंड, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून संशयित लपण्याच्या जागेची माहिती घेऊन त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी.४) आपापल्या हद्दीतील एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, पीएमपी बस स्टॅण्ड त्याचप्रमाणे महत्त्वाची धार्मिकस्थळे येथे लक्ष ठेवून संशयित व्यक्ती मिळून आल्यास त्याबाबत शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करावी.५) रात्रीच्या वेळी शहराबाहेरून येणारी वाहने, त्यातील व्यक्ती यांची तपासणी करून शहानिशा करावी. रात्री गस्तीस असणारे पोलिस अधिकारी/कर्मचारी यांना तशा सूचना द्याव्यात आणि नाइट राऊंड अधिकारी यांनी याबाबत खबरदारी घ्यावी.६) पंतप्रधानांच्या मार्गावरील नवीन बांधकाम सुरू असणारी ठिकाणे, रस्त्यांच्या कामाची ठिकाणे, तेथील कामगार तसेच रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्ड वगैरे परिसरामध्ये उघड्यावर उतरलेले लोक यांची बारकाईने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.७) महत्त्वाची धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, परदेशी नागरिक भेटी देणारे हॉटेल्स या लगत काही संशयितरीत्या वावरणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी.८) संबंधित सहायक पोलिस आयुक्त यांनी आपापल्या हद्दीतील हत्यारे, दारूगोळा विक्री करणारे व दारूगोळा साठा ठेवणारे विक्रेते यांच्या दुकानांची तपासणी करून अधिक माहिती घ्यावी व काही संशयित वाटल्यास योग्य ती कारवाई करावी.९) हद्दीतील परदेशी नागरिक, विद्यार्थी यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून काही संशयित आढळून आल्यास त्वरित योग्य ती कारवाई करावी.१०) पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या सीमी संघटनेच्या व इंडियन मुजाहिद्दीन कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच त्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.११) अतिरेक्यांनी पोलिस किंवा लष्कराच्या गणवेशाचा वापर करून केलेल्या हल्ल्याचा विचार करता बंदोबस्त ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीने सतर्क राहणे गरजेचे आहे.१२) दिवसाची गस्त, रात्रीची गस्त, नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, पायी गस्त अधिक परिणामकारक करावी.१३) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस ठाणे स्तरावर जरूर त्या योजना राबवाव्यात. सर्व संबंधितांनी वरील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घ्यावी.