सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune tour) रविवारी (दि.६) एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. देशात सर्वाधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या व्यक्तींमध्ये देशाच्या पंतप्रधानांचा समावेश असल्याने व पंजाब दौऱ्यातील दुर्घटनेनंतर पुणे दौऱ्यात प्रचंड खबरदारी घेण्यात आली आहे. मोदींच्या या दौऱ्यासाठी तब्बल १२ सेम डमी कार दिल्लीवरून पुण्यात दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नेमके कोणत्या कारमध्ये आहेत याची माहिती हल्लेखोरांना कळू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते.
देशात सर्वाधिक कडेकोट सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या व्यक्तींमध्ये देशाच्या पंतप्रधानांचा समावेश होतो. भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी)ची असते. ही एसपीजी टीम काही दिवसांपूर्वी पुण्यात दाखल झाली असून, पूर्ण खबरदारी व तयारी करत आहे. याचाच एक भाग व पंजाब दौऱ्यातील दुर्घटनेनंतर पुणे दौऱ्यात प्रचंड खबरदारी घेण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी थेट दिल्लीवरून या १२ सेम डमी कार गुरुवारी पुण्यात दाखल झाल्या आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासनाने ६० कार मोदी दौऱ्यासाठी अधिग्रहण केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात ते ज्या कारमध्ये बसून प्रवास करत असतात त्याच पद्धतीच्या दोन आणखी डमी कारदेखील ताफ्यात चालता्. यावेळी अधिकची खबरदारी म्हणून प्रत्येकी चार-चार डमी कार ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये या १२ कार तीन टप्प्यात दौऱ्यात सहभागी होणार आहेत. एअरपोर्ट ते महापालिका दरम्यान ४ कार, महापालिका भवन ते एमआयटीदरम्यान ४ कार आणि एमआयटी ते पुढील दौरा चार कार याप्रमाणे हा प्रवास असणार आहे. पंतप्रधान बुलेटप्रूफ रेंज रोव्हर, मर्सडीज आणि बीएमडब्ल्यू ७६० एलआय या आलिशान कारमधून प्रवास करतात. पुणे दौऱ्यात यापैकी कोणत्या कार असणार हे मात्र सांगितले नाही.