Pm Modi Pune Maharashtra Visit: २०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका यंदाच्या वर्षी होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे. अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये विविध कामांची उद्घाटने होत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे. पुढील महिन्यात १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापूरनंतर पुण्यातला चौथा दौरा आहे. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजर राहिले. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावरही येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता पुण्यात मोदी येणार असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकांच्या चर्चेदरम्यान त्यांचा हा दौरा बराच चर्चेत आहे.