पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र कामाला लागली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ज्या रस्त्यांनी जाणार आहेत तो मार्ग चकाचक करणे व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आह़े. यात खड्डेमुक्त रस्ते, रस्त्यालगतचे पदपथ व डिव्हायडरची रंगरंगोटी करणे, पथारी व्यावसायिक यांना हलविणे, अतिक्रमणे काढणे ही कामे प्राधान्याने सुरू करण्यात आली आहेत. सहा मार्चला होणारे कार्यक्रम
महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा मेट्रो प्रवास व त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोथरूड येथील एमआयटी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा व अन्य ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा६ मार्च
- सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन- हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय मैदान- पुणे महापालिका भवन येथे शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन- गरवारे मेट्रो उदघाटन - मेट्रोने आनंदनगर पर्यंत प्रवास- एमआयटी कॉलेज मैदान येथे जाहीर सभा- हेलिकॉप्टरने लव्हळे सिंबायोसिस कॉलेज येथे भेट - दुपारी २ वाजता दिल्लीकडे रवाना