पुणे : ‘‘नमस्ते डॉक्टर, तुम्ही प्रभुसेवेप्रमाणे जनसेवा करत आहात... कोरोना विषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत... देशवासियांना तुमच्याकडून संदेश हवा आहे...’’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ससून रुग्णालयातील डॉ. रोहिदास बोरसे यांच्याशी ‘मन की बात’ सुरू केली.
कोरोना रुग्णांची स्थिती, होम क्वारंटाईनची माहिती घेत मोदींनी ‘तुम्हा सर्वांच्या मदतीने कोरोनाविरुद्धची लढाई देश जिंकेल,’ असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच नायडू रुग्णालयातील परिचारिका छाया जगताप यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली होती. तसेच त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. त्यानंतर लगेच त्यांनी डॉ. बोरसे यांच्याशी संवाद साधला. डॉ. बोरसे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात मेडिसिन विभागातील प्राध्यापक आहेत. तसेच नायडू रुग्णालयातील कोरोना कक्षाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्याकडून कोरोनाची येथील सद्यस्थिती जाणून घेतली.
‘मन की बात’ला सुरुवात करताना मोदींनी प्रभुसेवेप्रमाणे जनसेवा करत असल्याबद्दल त्याचे कौतुक केले. तसेच लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपण या सेवेला समर्पित केले आहे. त्यामुळे तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे. तुम्हीच लोकांना संदेश द्या, असे आवाहन केले. त्यावर डॉ. बोरसे यांनी नायडू रुग्णालयातील कोरोनाग्रस्त व बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची माहिती दिली. ‘‘तरुणांनाही कोरोनाशी लागण होत आहे. पण त्यांच्यातील लक्षणांचे स्वरूप सौम्य आहे. तेही बरे होतील. परदेशातून आलेले व त्यांच्या संपकार्तील संशयितांचेच आपण नमुने घेत आहोत. त्यांना लागण झाली नसेल तर ‘होम क्वारंटाईन’चा सल्ला देतो,’’ असे बोरसे यांनी सांगितले. मोदींनी लगेच प्रतिप्रश्न करून घरात राहण्यासाठी कसे समजावता? अशी विचारणा केली. बोरसे यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली.
या सर्व गोष्टी ऐकून घेत मोदींनी शेवटी त्यांच्या कामाबद्दल आभार व्यक्त केले. ‘‘तुम्ही समर्पित भावनेने काम करत आहेत. त्यामुळे सर्व रुग्ण सुरक्षितपणे घरी जातील हा विश्वास आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने देश ही लढाई नक्की जिंकेल,’’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. त्यावर बोरसे यांनींनी ‘हम जितेंगे’ असे म्हणत त्यांना साथ दिली.
पंतप्रधानांनी दिले बळ
पंतप्रधानांनी डॉक्टरांशी थेट संवाद साधल्याने कामासाठी बळ मिळाले आहे. ससून व नायडू रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व सर्व कर्मचारी सध्या झटून काम करत आहेत. त्याचे कौतुक पंतप्रधानांनी केले, याचा अभिमान वाटतो. - डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.