पुणे : शहरांतर्गत अरुंद रस्त्यांवर प्रवाशांना चांगली सेवा देता यावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ५० मिनी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर संचालक मंडळाची मोहोर उमटल्यानंतर बस खरेदीचा मार्ग मोकळा होईल. पीएमपीच्या ताफ्यात या मिनी बस आल्यास शहराच्या मध्य भागातील अरुंद रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.शहरातील मध्य भागात पेठांमध्ये अनेक अरुंद रस्ते आहेत. या रस्त्यांवर पीएमपीकडील मोठ्या बस नेण्यास नेहमीच अडचण येते. त्याचा फटका प्रवाशांनाही बसतो. त्यामुळे या मार्गांवरील बसची नियमितताही कमी असते. सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ५० मिनीबस आहेत. मात्र, यातील जास्तीजास्त बस विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. उर्वरित बसचा वापर दैनंदिन प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो. याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पीएमपीला पेठांमधील मार्गांवर जास्तीत जास्त मिनी बसचा वापर करणे शक्य होत नाही. तसेच सध्याच्या मिनीबस १० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने वाहतूक करू शकत नाहीत. रस्त्यावरील वाहतुकीला त्यामुळे अडथळा निर्माण होतो. (प्रतिनिधी)४सर्व बाबींचा विचार करून पीएमपी प्रशासनाने ५० मिनी बस खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. ४जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयुआरएम) अंतर्गत या बसेसची खरेदी केली जाणार आहे. ४ शहराच्या मध्य वस्तीतुन इतर भागात जाणाऱ्या जवळच्या अंतरासाठी या बस वापरल्या जाणार आहेत. ४आणखी काही कमी अंतराचे मार्ग सुरू करण्याचा विचारही प्रशासनस्तरावर सुरू आहे. त्यासाठीही या बस फायदेशीर ठरणार आहेत.
पीएमपी घेणार ५० मिनीबस
By admin | Published: February 19, 2015 1:11 AM